एनडीएच्या बैठकीला अजित पवारांची उपस्थिती;विरोधी पक्षांच्या बंगळुरु येथील बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार

मुंबई,१७ जुलै /प्रतिनिधी :- अजित पवार यांनी काही आमदारांच्या पाठिंब्यावर शिंदे सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेऊन मंत्रीपदाची शपथ घेतली. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार हे उद्या (१८ जुलै) रोजी दिल्ली येथे होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला हजर राहणार असल्याचं सांगितलं आहे. अजित पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल देखील या बैठकीला हजर राहणार आहेत. प्रफुल्ल पटेल यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

दिल्ली येथे मंगळवार १८ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या एनडीएच्या बैठकीला राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासह उपस्थित राहणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी जाहीर केलं होतं. दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये होणाऱ्या या बैठकीला एनडीएचे माजी घटक पक्ष असलेले शिरोमणी अकाली दलाचे (एसडी) अध्यक्ष सुखबीर सिंग बादल आणि तेलुगू देसम पार्टी;चे (टीडीपी) अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे देखील उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एकत्र येत सर्व विरोधकांनी आगामी लोकसभेत मोदींच्या विजयी रथ रोखण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या पुढाकाराने पाटणा येथे विरोधकांच्या पहिल्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.आता पाटणा येथे झालेल्या बैठकीनंतर विरोधकांनी बंगळूरु येथे दुसऱ्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, या बैठकीपूर्वी आयोजित स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार उपस्थित राहणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी याबाबातची माहिती दिली आहे. एएनआय या वृत्त संस्थेने देखील याबाबतचं वृत्त दिलं आहे. बंगळुरु येथे आजपासून विरोधाकांच्या दोन दिवसीय बैठकीला सुरुवात होतं आहे.

पाटण्यात झालेल्या पहिल्या बैठकीपेक्षा आज बंगळुरु येथे झालेल्या दुसऱ्या बैठकीला जास्त महत्व प्राप्त झालं आहे. कारण या बैठकीला पाठिंबा देणाऱ्या विरोधी पक्षांची संख्या देखील वाढली आहे. या बैठकीपूर्वीच्या स्नेहभोजनाला शरद पवार हे उपस्थित राहणार नसले तरी ते उद्याच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितलं आहे.