शिवसेनेचा निकाल लागल्यानंतर चर्चा काही करता येत नाही-शरद पवार

मुंबई ,१७ फेब्रुवारी /प्रतिनिधी :-शिवसेनेच्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या निकालानंतरच्या वातावरणाची जणू काही हवाच काढलीय. निवडणूक आयोगाच्या निकालाने फार काही फरक पडणार नाही, असं शरद पवार स्पष्ट म्हणाले आहेत. शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय अनुभवी आणि मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांच्या प्रत्येत प्रतिक्रियेला अतिशय महत्त्व असतं. त्यामुळे शरद पवार यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर दिलेली प्रतिक्रिया महत्त्वाची आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाला नवा उमेद देण्यासाठी ही प्रतिक्रिया महत्त्वाची आहे. त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत देशाच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि काँग्रेस पक्षाचं उदाहरण दिले आहे.

“हा तर निवडणूक आयोगाचा निकाल आहे. त्याचा निकाल लागल्यानंतर चर्चा काही करता येत नाही. त्याने फार काही होत नसतं. मला आठवतं काँग्रेसमध्ये एकदा इंदिरा गांधी आणि इतर हा वाद झाला. त्यावेळी काँग्रेसची बैलजोडी खूण होती. पण ती बैलजोडी निवडणूक आयोगाच्या निकालाने गेली. पण काँग्रेसने त्यावेळी हात चिन्ह घेतलं. ते चिन्ह लोकांनी मान्य केलं. त्यामुळे त्याचा फार काही फरक पडत नाही. तसंच शिवसेनेच्या बाबतीत लोकं नवं चिन्ह मान्य करतील. ही चर्चा महिनाभर चालेल”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

भाजपच्या पोटात आनंद मावेना
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं आहे. निवडणूक आयोग कायद्यानुसार चालतो. याआधी अशा घटना घडल्या, त्यावेळी आयोगानं असेच निर्णय दिले होते. त्यामुळे आयोग असाच निर्णय देईल असं वाटलं होतं. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला चिन्ह, नाव मिळालं. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. खरी शिवसेना शिंदेंचीच आहे. कारण त्यांची शिवसेना विचारांची आहे, असं फडणवीस म्हणाले.

“निवडणूक आयोग अंतिम नाही, आम्ही न्यायालयात जाऊ शिवसेनेचे खरे अधिष्ठान उद्धव ठाकरे यांच्या नावात” – सुषमा अंधारे

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी निवडणूक आयोग आणि भाजपावर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, “ससंदीय लोकशाहीमध्ये अहस्तक्षेपाचं तत्व आणि सत्तेचे विकेंद्रीकरण या दोन महत्त्वाच्या आधारशीला असतात. भाजपाच्या दंडेलशाहीच्या राजकीय कारकिर्दीत मात्र या दोनही तत्त्वांना हरताळ फासण्याचे आणि या आधारशीला खिळखिळ्या करण्याचे काम सातत्याने सुरु आहे. निवडणूक आयोगाने आज दिलेला निकाल हा बघण्याच्या आधी मागील तीन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांनी तिघांच्या प्रतिक्रिया तपासून पाहिल्या तर सर्वच स्पष्ट होईल.”

उद्धव ठाकरे यांचे नावच शिवसेनेचे अधिष्ठान

हे तीनही नेते धनुष्यबाण आम्हालाच मिळणार, निकाल आमच्याच बाजूने लागणार, कोऱ्या स्टँप पेपरवर लिहून घ्या, अशा वल्गना करतात. याचाच अर्थ स्वायत्त यंत्रणामध्ये काय पद्धतीने हस्तक्षेप झालेला आहे, हे चित्र स्पष्ट होत आहे. पण निवडणूक आयोग हा काही अंतिम नव्हे. आम्ही न्यायालयीन लढा लढणार आहोत. प्रतिकांच्या राजकारणापेक्षा मुल्यधिष्ठीत राजकारण मोठे असते. शिवसेनेचे अधिष्ठान हे सेना भवन, मातोश्री आणि सन्मानीय ठाकरे या नावांमध्ये आहे.

शिवसेना नेते संजय राऊत काय म्हणाले?

“सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य तोडून आता असत्यमेव जयते करावे लागेल. खरेदी विक्री कुठपर्यंत गेली आहे. हे आज स्पष्ट झाले. जो पक्ष बाळासाहेब ठाकरे आणि लाखो शिवसैनिकांनी रक्त आणि बलिदान देऊन उभा केला. तो पक्ष आणि त्याचे चिन्ह ४० बाजारबुणगे विकत घेतात. याची नोंद इतिहासात राहील. आज या देशातल्या निवडणूक आयोगावरचा विश्वास जनतेने गमावला.”

निवडणूक आयोगाचा निर्णय धक्कादायक : सुप्रिया सुळे

कुणावर विश्वास ठेवायचा हे कळत नाहीये. निवडणूक आयोग हे खूप पारदर्शक आहे. हा निर्णय मला कळतच नाहीये. हा निर्णय कसा झाला. या शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी केली. बाळासाहेब हयात असताना त्यांनी ठरवलं होतं की, बाळासाहेबांनंतर शिवसेना ही उद्धव ठाकरे बघतील, पण हा निर्णय धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.