दुबईत ट्रॅव्हल एजन्सीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून वैजापूरच्या तरुणाची एक लाख दहा हजार रुपयांची फसवणूक

वैजापूर ,१७ जुलै /प्रतिनिधी :-दुबई विमान तळावर शारजाह एअरपोर्ट ट्रॅव्हल एजन्सीमध्ये ट्रॉली बॉय चे काम देतो असे म्हणून मुंबई येथील एकाने वैजापूरच्या एका बेरोजगार तरुणाकडून एक लाख दहा हजार रुपये लुबाडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी साजिद खान रज्जाक खान रा.मुंबई याच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश पदमसिंग राजपूत (रा.परदेशी गल्ली वैजापूर) यांची नांदगांव शिवारात शेती असून ते शेतीवर उपजीविका करतात. पोलीस स्टेशन रोड येथे राहणारे वाजीद शेख शब्बीर यांच्याशी मुकेश राजपूत याची ओळख होती. माझ्या ओळखीचे मुंबई येथील साजिद खान यांनी सोहेल खान सरफराज खान रा.जुनी भाजी मंडई वैजापूर यांना दुबई येथील विमान तळावर नोकरीला लावले आहे.मी त्यांना सांगून तुलाही नोकरीला लावतो असे वाजीद याने मुकेशला सांगितले. त्यावर मुकेशने नोकरीसाठी होकार दिला. त्यानंतर  24 जानेवारी 2020 रोजी साजिद खान हा वैजापूर येथील पोलीस स्टेशन रोडवरील तमीज शेख लड्डू यांच्या घरी आला असता वाजीद शेख याने मुकेशला तमीज यांच्या घरी बोलावून दोघांची भेट घडवून आणली. त्यावेळी साजिद खान याने, या अगोदर मी शारजाह ट्रॅव्हल एजन्सीमध्ये बरीच मुले नोकरीला लावली असून व्हिसा व राहण्या – खाण्यासाठी एक लाख दहा हजार रुपये लागतील असे मुकेशला सांगितले. त्यावर विश्वास ठेवून मुकेशने साजिद खान याच्या खात्यावर तीन वेळा वेगवेगळी रक्कम फोन पे द्वारे पाठवून एकूण एक लाख दहा हजार रुपये जमा केले. मात्र, त्यानंतर साजिद खान याने लॉकडाऊन चे कारण सांगत नोकरी देण्याचे टाळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुकेश राजपूत याने पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून साजिद खान याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.