फाशी झाली तरी चालेल, पण… ; जामीनानंतर काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

मुंबई,१२ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विवियाना मॉल मारहाण प्रकरणात ठाणे कोर्टातून जामिनावर सुटका करण्यात आली. सुटका झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. “फाशी झाली तरी चालेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विद्रुपीकरण होऊ देणार नाही” या भूमिकेवर ते ठाम आहेत. तर, ‘माझ्या अटकेवेळी पोलिसांची हतबलता दिसून आली. छत्रपती शिवाजी महाराजांची होणारी बदनामी रोखण्याचा आम्ही गुन्हा केला का? असा सवाल त्यांनी विचारला.

“छत्रपती शिवाजी महाराजांना नरसिंहाच्या अवतार दाखवल्याने त्यांच्या चातुर्याला धक्का लागला आहे. महिलांचा बाजार भरत होता, असा खोटा इतिहास हर हर महादेव चिटपटात दाखवला आहे. याचे काहीच ऐतिहासिक पुरावे नाही, असे सांगताना महाराजांनी माणसांच्या खरेदी विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. तरीही तसे दाखविण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासला धक्का लागत आहे. बाजूप्रभू त्यांच्या विरोधात होते हे दाखवत बाजीप्रभू देशपांडेच्या इतिहासाला धक्का लावत आहेत.” असे आरोप जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केले आहेत.

पुढे जितेंद्र आव्हाड यांनी आरोप करताना म्हंटले की, “महाराष्ट्राला दाखविण्यासाठी घाईगडबडीने अटक करण्यात आली. आम्ही काहीही करू शकतो हे दाखविण्यासाठी आम्हाला अटक करण्यात आली. आम्हाला काल पोलिस ठाण्यात ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला. प्रेक्षकाला आम्ही मारहाण केली नाही, हे त्यानेच स्पष्ट केले. तरीही मला अटक करण्यात आली, यामागे कोण आहे. हे स्पष्ट करण्याची गरज नाही ते सर्वांना माहिती आहे. पोलिसांचा यात काहीच दोष नाही त्यांच्यावर दबाव होता,”

आव्हाड यांना जामीन मंजूर

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह १२ जणांना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने १५ हजारांच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर केला आहे. तसेच तपासाला सहकार्य करण्याचे निर्देश न्यायालयाने आव्हाड यांना दिले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांच्याकडून अ‌ॅड. प्रशांत कदम यांनी युक्तिवाद केला. सुनावणीदरम्यान अ‌ॅड. कदम यांनी सांगितले की, जितेंद्र आव्हाडांची अटक बेकायदेशीर आहे. अटक करण्याच्या ७२ तास आधी आव्हाडांना नोटीस देणे आवश्यक होते. मात्र, पोलिसांनी तसे केले नाही. नियमांचे उल्लंघ करुन, कोणताही प्रोटोकॉल न पाळता आव्हाडांना अटक करण्यात आली आहे.

आव्हाडांच्या वकिलांनी सांगितले की, आव्हाड हे पोलिसांना चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करत आहेत. ते स्वत: पोलिस स्टेशनमध्ये नोटीस घेण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांच्यावर जामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, नंतर अजामीनपात्र गुन्ह्याची कलमे लावण्यात आली. आव्हाडांनी चित्रपटगृहात कोणालाही मारहाण केलेली नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात दाखल गुन्हे चुकीचे आहेत. तर, सरकारी वकिलांनी चौकशीसाठी आव्हाडांची ८ दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. मात्र, न्यायालयाने ती फेटाळली. चित्रपटगृहात प्रेक्षकांना मारहाण करत ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडल्याप्रकरणी वर्तक नगर पोलिसांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना काल अटक केली होती.

कांगावा करणं ही आव्हाडांची स्टाइल-फडणवीसांची बोचरी टीका

मुंबई : एखाद्या गोष्टीचा कांगावा करणे ही जितेंद्र आव्हाडांची स्टाइल आहे, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी लगावला. आव्हाडांना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

जितेंद्र आव्हाडांना न्यायालयाने १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. तसेच तपासाला सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.

आव्हाडांवर बोलताना फडणवीस म्हणाले की, एखाद्या गोष्टीचा कांगावा करणे ही जितेंद्र आव्हाडांची स्टाइल आहे. कुठल्याही गोष्टीचे उद्दातीकरण करण्याचा प्रयत्न ते करतात. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह जाऊन थिएटरमध्ये जो तमाशा केला, मारहाण केली. त्यामुळे कारवाई झाली. कोणीही असे केले असते, तर असेच झाले असते. खूप काही तरी केल्याचा देखावा करण्याचा आव्हाडांना नाद. त्यातून असे प्रकार होतात, असे म्हणत त्यांनी टोला लगावला.

दरम्यान, अफजल खानाच्या कबरीजवळील अतिक्रमण कारवाईबाबत फडणवीस म्हणाले की, निश्चितपणे आता पुन्हा तिथे अतिक्रमण होणार नाही, असा प्रयत्न केला जाईल. कुठलेही अतिक्रमण असेल, ते तिथून काढले जाईल.

पूर्ण गुजरात मोदींच्या पाठिमागे आहे. तिथे त्यांना अभूतपूर्व विजय मिळेल. पक्षाने जी जबाबदारी दिली आहे, ते काम करू. त्याचा आनंद आहे, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.