वैजापूर येथे होणाऱ्या ब्रह्मलीन गंगागिरी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहसाठी आ.बोरणारे व संचेती कुटुंबियांकडून प्रत्येकी ११ लाखांची वर्गणी

वैजापूर ,१६ जुलै /प्रतिनिधी :- वैजापूर शहरात सदगुरु गंगागिरी महाराज यांच्या १७६ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे २१ ते २७ ऑगस्ट दरम्यान सराला बेटाचे महंत  ह.भ.प रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात येणार आहे. या सप्ताहसाठी आ.रमेश पाटील बोरणारे यांच्याकडून ११ लाख ५१ हजार रुपये तर संचेती कुटुंबियांकडून ११ लाख रुपयांची देणगी सप्ताह समितीकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

सप्ताह आयोजन समितीकडून याठिकाणी दररोज लाखो भाविकांची उपस्थिती लक्षात घेऊन, धार्मिक कार्यक्रमासाठी भव्य शामियाना, आमटी भाकरीचा महाप्रसाद अशा अनेक सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येणार असून त्यासाठी दानशूर भाविकांकडून देणगी स्वीकारण्यास  सुरुवात केली आहे. सराला बेटाचे धार्मिक तीर्थस्थळ उभारणी करीता वैजापूर येथील संचेती कुंटुबांनी गोदावरी नदी क्षेत्रालगतची ७५ एकर जमीन सदगुरु गंगागिरी महाराजाना दान स्वरुपात दिलेली आहे. तसेच दिवंगत नगरशेठ बन्सीलाल संचेती यांनी ही वेळोवेळी सराला बेटातील धार्मिक कार्याला सहकार्याची भूमिका निभावली आहे. श्रीक्षेत्र सराला बेट हे अहमदनगर, नाशिक व मराठवाड्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान म्हणून नावारुपाला आलेले आहे. 

वैजापूर शहर परिसरात २३ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे. या सप्ताहासाठी संचेती कुंटुबांचे प्रमुख तसेच उद्योजक जीवनलाल संचेती, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, मर्चंट बॅंकेचे चेअरमन विशाल संचेती यांनी 11 लाख रुपयांची भरीव देणगी सप्ताह समितीकडे सुपूर्द केली. तर आ.रमेश पाटील बोरणारे व त्यांचे धाकटे बंधू संजय पाटील बोरणारे यांनीही सप्ताहासाठी 11 लाख 51 हजार रुपये देणगी सप्ताह समितीचे उपाध्यक्ष साबेर खान व सप्ताह समितीच्या सदस्यांकडे सोपवली. यावेळी सप्ताह समितीचे अध्यक्ष आ.रमेश पाटील बोरनारे, कार्याध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, उपाध्यक्ष साबेरखान, सचिव बाबासाहेब जगताप, माजी उपनगराध्यक्ष शेख अकील शेख गफूर, तालुकाप्रमुख राजेंद्र सांळुके, शहरप्रमुख पारस घाटे आदी उपस्थित होते.