डवाळा – खंबाळा रस्त्यावर दारूची अवैध वाहतूक ; दोघांकडून 17 हजाराची दारू जप्त

वैजापूर ,​२​ जानेवारी / प्रतिनिधी :- मोटारसायकलीवरून देशी व विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांकडून पोलिसांनी 17 हजार रुपये किंमतीच्या दारूसह असा एकूण 87 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. 31 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास समृद्धी महामार्गालगत तालुक्यातील डवाळा-खंबाळा रस्त्यावर पोलिसांनी ही कारवाई केली.

    याप्रकरणी सुभाष साहेबराव फुलारे रा.लाडगाव रोड व संतोष शिवलाल शिहरे रा.सावता नगर या दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेजण समृद्धी महामार्गालगत असलेल्या रस्त्याने मोटारसायकलवरून (एम.एच 20 एफ.टी. 3436) देशी व विदेशी दारूची  अवैध वाहतूक करीत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली. त्यानुसार सकाळी आठ वाजेच्या सुमारास पोलिसांनी  सापळा रचून  दुचाकीने जात असलेल्या दोघांना अडविले व त्यांच्याकडील  गोणीची तपासणी केली असता गोणीत 13 हजार रुपयांची देशी व 3 हजार 900 रुपये किंमतीच्या विदेशी मद्याच्या बाटल्या मिळून आल्या. कारवाई दरम्यान पोलिसांनी दोघांकडून दारूच्या बाटल्यांसह मोटारसायकल, मोबाईलसंच असा एकूण 87 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.