चांदेगाव-नागमठाण शिवारात गोदावरी नदीवर सुरू असलेल्या कामावरील साहित्याची चोरी ; तिघांना अटक

वीरगाव पोलिसांची कामगिरी

वैजापूर ,१६ जुलै /प्रतिनिधी :- वीरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चांदेगाव- नागमठाण शिवारात गोदावरी नदीवर सुरु असलेल्या पुलाच्या कामावरील लोखंडी गज, लोखंडी प्लेटा व पाईप असे सुमारे ५६ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरीस गेल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली होती.

पोलिस अधिक्षक मनीष कलवानिया, अप्प्र पोलिस अधिक्षक सुनिल लांजेवार, वैजापूर उपविभागाच्या सहायक पोलिस अधिक्षक महक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली विरगाव पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी एस.एस.रोडगे, पोलिस उपनिरीक्षक नवनाथ कदम, कॉन्स्टेबल प्रवीण अभंग, सतीश गायकवाड व शुभम रावते यांनी तपासात  गोपनीय माहितीच्या आधारे तिघांना ताब्यात घेतले व चौकशी केली असता हा गुन्हा त्यांनीच केल्याची कबुली दिली. लक्ष्मण उर्फ भावड्या चांगदेव भगत (२७, राहणार, श्रीरामपूर), बाळु निवृत्ती मते (४५) व कृष्णा राजेंद्र काळे (३५), दोघे राहणार नागमठाण अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडुन ५६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.