विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या आढावा बैठकीत तक्रारींचा पाढा ; अधिकाऱ्यांना धारेवर धरले, बियाणांचा काळाबाजार होत असल्याची तक्रार 

वैजापूर येथे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक

वैजापूर ,१६ जून/ प्रतिनिधी :-  शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवगर्जना संपर्क मोहिमेअंतर्गत विरोधी पक्ष नेते तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी शुक्रवारी वैजापुरच्या दौऱ्यात येथील पंचायत समिती कार्यालयात विविध विभागाच्या तालुकास्तरीय अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. या बैठकीत शेतकरी व ग्रामस्थांनी बी-बियाणांचा तालुक्यात मोठ्याप्रमाणावर काळा बाजार सुरु असल्याचा आरोप करत प्रशासनाला धारेवर धरले. याशिवाय अन्य विभागातील तक्रारींचा अक्षरशः पाढाच वाचला. त्यामुळे अधिकाऱ्यांची भंबेरी उडाल्याचे बघायला मिळाले. मात्र, अंबादास दानवे यांनी अतिशय तक्रारदार व प्रशासकिय अधिकारी यांच्यात सुसंवाद घडवुन आणत तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न केला व संबंधित अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. तालुकास्तरावर विविध समस्यांच्या एकत्रित माहितीवर जिल्हास्तरावर चर्चा करणार असून त्यावर तोडगा न निघाल्यास शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत मंत्रालयात सचिव स्तरापर्यंत आवाज उठवून शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देऊ असे दानवे म्हणाले. 

या बैठकीला उपविभागिय अधिकारी अरुण जऱ्हाड, नायब तहसिलदार महेंद्र गिरगे, प्रभारी गटविकास अधिकारी हणमंत बोयनर, उपविभागिय कृषि अधिकारी अशोक आढाव, तालुका कृषि अधिकारी थत्ते यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, शिवसेना सह संपर्कप्रमुख ॲड. आसाराम रोठे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मनाजी मिसाळ, महिला आघाडीच्या आनंदीबाई अन्नदाते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष लता पगारे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत विठ्ठल डमाळे, रमेश सावंत, वाल्मिक जाधव, अमोल बावचे आदींसह अनेक शेतकऱ्यांनी कपाशीच्या बियाण्यांचा होत असलेला काळा बाजार, पिक कर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणी, विमा मंजुर न होणे, निराधार योजनांची अपुर्ण कामे, महाराष्ट्र रोजगार हमी योजने अंतर्गत कामांचे असंतुलित वाटप, हजेरी पत्रक याबाबत तक्रारींचा पाऊस पाडत प्रशासनाला धारेवर धरले.‌ वैजापूर येथे संकेत वाणाचे कपाशी बियाणे तीन हजार रुपयांना मिळत असल्याचा आरोप एका शेतकऱ्याने केला. याशिवाय अन्य वाणाचे बियाणे वेगवेगळ्या भावाने विकले जात असुन त्यांचा काळा बाजार होत असल्याच्या तक्रारी केल्या. कृषि विभागाने जिल्ह्याकडुन तालुक्याला मंजुर झालेले बियाणांचे आवंटन व तेथून डिलर, सब डिलर व किरकोळ विक्रेत्यापर्यंत झालेले बियाण्यांचे वाटप याबाबत पारदर्शक माहिती जनतेपर्यंत पोहचवावी असे निर्देश दिले. याशिवाय गंगापूर व सिल्लोडच्या धर्तीवर वैजापूर येथेही रोजगार हमीच्या हजेरीपत्रकाची कामे ग्रामपंचायत स्तरावर करण्यासाठी प्रस्तावित करण्याची सुचना बैठकीत देण्यात आली.‌ याशिवाय निराधार योजनांची प्रकरणे मंजुर करणे, विम्यापासुन वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना विमा देणे, सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत दानवे यांनी सुचना केल्या.