वैजापूर पालिकेतर्फे प्लास्टिक वापर प्रकरणी व्यापाऱ्यांना नोटीस

वैजापूर, १० नोव्हेंबर / प्रतिनिधी :-प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणारे, प्लास्टिक वापरणे, विक्री करणे, साठविणे, वाहतूक करणे ईत्यादी बाबीवर शासनाने बंदी  घातलेली असताना ही या नियमांचे उल्लघन करणे तसेच 75 मायक्रोन पेक्षा कमी जाडीचे व एकदाच वापरात येणारे प्लास्टिकवर बंदी असूनही सदर प्लास्टिक वापरणे वैजापुरात वाढत असल्याने गुरूवारी (ता.10) पालिकेचे स्वच्छता निरीक्षक सुरेश चिमटे व स्वच्छतादूत धोंडीरामसिंह राजपूत यांच्या पथकाने प्रत्यक्ष स्पीकरवर दवंडी देऊन प्लास्टिक वस्तू न वापरण्याबाबत जागृती केली. या दरम्यान  काही फळ विक्रेते, काही दुकानदार व व्यापारी यांना  नोटीस बजावून कायदेशीर कार्यवाहीचा आरंभ केला.

सदरील कार्यवाही महाराष्ट्र नगरपरिषद नगर पंचायत औद्योगीक नगर अधिनियम 1965 अन्वये करण्यात आली. यानंतर ही प्लास्टिक वापर करताना आढळल्यास कडक कार्यवाही करणार असल्याच्या संबंधीताना सूचनाही देण्यात आल्या आहेत. या पथकात प्रभारी स्वच्छता निरीक्षक विष्णू आलूले, प्रमोद निकाळे, रमेश त्रिभुवन, कैलास त्रिभुवन, चेतन निखाडे,अस्लम शेख, अहमद शेख यांच्यासह अनेक कर्मचारी सहभागी झाले होते.