लाडगाव रस्त्याच्या प्रवेशद्वाराजवळ मोठा खड्डा ; सार्वजनिक बांधकाम विभाग व पालिकेचे दुर्लक्ष

रस्ता कोणाचा हा वाद मिटवून संबंधित विभागाने  त्वरीत दुरुस्त करावा – नागरिकांची मागणी  

वैजापूर ,​९​ जुलै / प्रतिनिधी :-शहरातील नाशिक – निर्मल राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या लाडगांव प्रवेशद्वारजवळ गेल्या एक ते दीड महिन्यापासून रस्त्याच्या मधोमध एक मोठा खड्डा पडलेला असून याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. या खड्डयामुळे एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. परंतू याकडे संबंधित विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

एखादा मोठा अपघात होऊन काही लोक मेल्यावर हा रस्ता दुरुस्त होण्याची वाट तर संबंधित बघत नाही ना ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.हा रस्ता ज्या कुणाच्या अखत्यारीत येत असेल त्यांनी  दुरुस्त करावा. सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा नगरपालिका यांनी आपसात समन्वयातून चर्चा करावी व रस्ता कुणाचा हा वाद मिटवून खड्डा त्वरीत दुरुस्त करावा.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ठाकूर धोंडिरामसिंह राजपूत यांनी केली आहे. 

हा रस्ता रहदारीचा असून या रस्त्यावर नेहमीच गर्दी असते. काही महिन्यांपूर्वी या रस्त्याजवळच अपघात होऊन एका तरुण महिलेला आपला जीव गमवावा लागला. या रस्त्याच्या मधोमध सध्या मोठा खड्डा पडलेला असून अनेक नागरिकांना या खड्यामुळे अपघात झाले ते अधु होऊन घरात पडलेले आहेत. आणखी जीव जावा किंवा येथे अपघात व्हावे असे वाटत असेल तर हे वैजापुरकरांचे दुर्दैव म्हणावे लागेल.