श्रीक्षेत्र सराला बेट येथे गुरुपौर्णिमा उत्सव सोहळा उत्साहात साजरा

गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा उत्सव – महंत रामगिरी महाराज


वैजापूर ,​३​ जुलै / प्रतिनिधी :-संतांनी अस्मितेचे, बोली भाषांचे रक्षण करून आत्मभान दिले आहे. स्वधर्म, स्वभाषा व संस्कृतीशी आपण एकनिष्ठ राहिलो. गुरू शिष्याच्या डोळ्यांत ज्ञानाजंन घालतात त्याचे श्रेय संतांना,सदगुरूना जाते. सदगुरू जगण्यासाठी फार मोठे बळ देत असतात. म्हणूनच संत सदगुरू हे समाजाचे दीपस्तंभ आहेत.ते भक्ताच्या शिष्याच्या अज्ञानरूपी अंधारात वर ज्ञानांजन घालून ज्ञानाचा प्रकाश देतात असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.

श्रीक्षेत्र गोदाधाम सराला बेटावर सोमवारी (ता.03) व्यासपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराजांनी उपदेश केला. ज्ञानेश्वरीतील ओवीचे विवेचन करताना महाराज म्हणाले की सदगुरूबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला जातो. गुरू हे शिष्याला योग्य मार्गदर्शन करून अनुकूल व प्रतिकूल परिस्थितीत शिष्याचे मनोबल वाढवून योग्य मार्ग दाखवतात. संतांनी टाळकुटेपणा केला, प्राक्तनवाद वाढवला व प्रयत्नवादाला खिळ घातली असे बोल लावले जातात. परंतु या संतांची मांदियाळी निर्माण झाली म्हणूनच जीवनाचा मार्ग सुकर झाला. त्यांच्या सात्विकतेची समाजाला आज गरज आहे. विज्ञानाच्या बळावर जगाने विजय मिळविला असेल, परंतू मानवी जीवनातील अगतिकता कमी झालेली नाही. प्रगतीबरोबरच अधोगतीपण सुरू आहे असे त्यांनी सांगितले. बुध्दी आणि भावना यांचा संघर्ष चालूच असतो. मनुष्य विरोधाभासाने भरलेला आहे. मात्र सगळे आवाज बंद झाले तरी विवेकाची ज्योत अखंडपणे तेवत असते. विज्ञान आणि अध्यात्म हे दोन पंख असल्याशिवाय माणूस तरू शकणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.


यावेळी माजी आमदार भाऊसाहेब चिकटगांवकर, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, उपनगराध्यक्ष साबेरखान, संतोष जाधव, अविनाश गंलाडे, सचिन वाणी, बाळासाहेब कापसे, संजय निकम, प्रकाश चित्ते बबनराव मुठ्ठे, काळु वैद्य, बाबासाहेब चिडे, भाऊसाहेब झिजुर्डे, दत्तु खपके, सरला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज यांच्यासह बेटावरील महाराज मंडळी, विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, शैक्षणिक व आध्यात्मिक क्षेत्रातील मंडलीसह हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.

माजी आमदार स्व.कैलास पाटील चिकटगावकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, अभय चिकटगावकर, गोरक्षनाथ भडके यांच्यावतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.