कितीही जनावरे एकत्र आली तरी वाघाची शिकार करु शकत नाहीत-विरोधकांच्या एकजुटीवर देवेंद्र फडणवीस यांचा निशाणा

नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी वाघ आहेत. कितीही जनावरे एकत्र आले तरी वाघाची शिकार करू शकत नाही, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. आज नागपूर येथे काँग्रेसमधून निलंबित झालेले आशिष देशमुख यांनी जाहीर कार्यक्रमात भाजप प्रवेश केला. त्यावेळी आशिष देशमुखांची स्तुती करत देवेंद्र फडणवीस यांनी देशभरातील भाजप विरोधक तसेच महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.

फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे जेमतेम दहा आमदार देखील उरलेले नाहीत. तरी वज्रमूठ सभेत येऊन आपलीच सभा असल्यासारखे ते हातवारे करतात. म्हणजे गर्दी इतर पक्षांची आणि हातवारे करतात उद्धव ठाकरे. त्यामुळे वज्रमुठीत आता इतके तडे गेले आहेत की, त्यांची आता वज्रमुठ होऊच शकत नाही.

विरोधकांकडे चेहरा नाही

ते पुढे म्हणाले, मुळात विरोधकांकडे कोणताही चेहराच नाही. नेतृत्व कुणी करावे, यावरूनच त्यांच्यामध्ये प्रचंड मतभेद आहेत. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसने डाव्यांसोबत हातमिळवणी केली आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेस नाराज झाली आहे. आपण काँग्रेससोबत जाऊ शकत नाही, असे ममता बॅनर्जींनी म्हटले आहे. इतर राज्यांतही तशीच स्थिती आहे. ते एकमेकांनाच पाडण्याचाच तयारीत आहेत.

नरेंद्र मोदी वाघ

देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझे म्हणणे शब्दश: घेऊ नका. मात्र, ज्याप्रमाणे जंगलात कितीही जनावरे एकत्र आली तरी ते वाघाची शिकार करू शकत नाही. त्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांना कुणीही पराभूत करू शकत नाही. नरेंद्र मोदी हे राजकारणातील वाघ आहेत. जनसामान्यांच्या हितासाठी ते अविरत काम करत असतात. मन की बातच्या माध्यमातून देशातील २३ ते २४ कोटी जनतेशी ते थेट संवाद साधतात. जनतेशी त्यांची नाळ जुडलेली आहे.

आशिष देशमुखांवर ओबीसी सेलची जबाबदारी

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आशिष देशमुखांवर आता भाजपच्या विदर्भ ओबीसी सेलची जबाबदारी असणार आहे. आशिष देशमुखांमध्ये माणसे जोडण्याची, नेतृत्व करण्याची क्षमता आहे. त्यांच्यामध्ये फक्त एकच कमतरता होती. ती म्हणजे ते आतापर्यंत भाजपसोबत नव्हते. त्यांनी आता भाजपवर श्रद्धा ठेवावी. त्यांचे पुढे काय करायच?, हे आपण बघू.

दरम्यान, आशिष देशमुख यांनीही या कार्यक्रमात जाहीर घोषणा केली आहे की, ते पुढची विधानसभा, लोकसभा कोणतीच निवडणूक लढवणार नाही. ही घोषणा करण्यापूर्वी त्यांनी आम्हा कोणासोबतच चर्चा केली नाही. अशी घोषणा करायचा धाडस लागते. मी आशिष देशमुख यांना विश्वासाने सांगतो की, त्यांनी कोणतीही चिंता करू नये. भाजप हाच त्यांचा अंतिम पक्ष असणार आहे.