देशावर आणीबाणी :भारताच्या इतिहासातील हा एक काळा कालखंड-पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली,१८ जून / प्रतिनिधी:- भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीच्या काळावर पंतप्रधानांनी भाष्य केले. यावर बोलतांना पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, ‘आणीबाणीच्या काळाला आपण कोणीच कधीच विसरु शकत नाही. हा भारताच्या इतिहासातील एक वाईट काळ होता. अनेकांनी या गोष्टीला विरोध करण्यासाठी आपली शक्ती लावली होती. त्यावेळी लोकशाहीवर एवढा अन्याय करण्यात आला होती आजही त्या गोष्टीची आठवण झाली की अंगावर काटे येतात. आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना या गोष्टींवर देखील नजर फिरवायला हवी. या गोष्टीच तरुण पिढीला लोकशाहीचा अर्थ आणि महत्त्व शिकवण्यास मदत करतील.’

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील नागरिकांशी संवाद साधतात. रविवारी रोजी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या १०२ व्या भागाचे प्रसारण करण्यात आले आहे. मन की बात हा कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित करण्यात येतो. मात्र या महिन्यात हा कार्यक्रम १८ जून रोजी म्हणजेच एक आठवडा आधीच प्रसारित करण्यात आला आहे. यावेळी पंतप्रधानांनी म्हटलं की, ‘मन की बात हा कार्यक्रम महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होतो, परंतु या वेळेस हा कार्यक्रम एक आठवडा आधीच प्रसारित होत आहे.तुम्हा सगळ्यांना माहित आहे, मी पुढच्या आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहे आणि तिथे मी अनेक कार्यक्रमांमध्ये व्यस्त असेल. त्यामुळे मी दौऱ्यावर जाण्याआधी तुमच्याशी संवाद साधावा असा विचार केला आणि याहून चांगले काय असू शकते.’

“भारत लोकशाहीची जननी आहे, लोकशाहीची माता आहे. आपण आपल्या प्रजासत्ताक आदर्शांना सर्वोच्च स्थान देतो, आपल्या संविधानाला सर्वोत्तम मानतो आणि म्हणूनच आपण 25 जून हा दिवस विसरू शकत नाही.याच दिवशी आपल्या देशावर आणीबाणी लागू करण्यात आली होती.भारताच्या इतिहासातील हा एक काळा कालखंड होता. लाखो लोकांनी संपूर्ण शक्तीनिशी आणीबाणीचा विरोध केला. लोकशाहीच्या समर्थकांवर त्या काळात इतके अत्याचार करण्यात आले, त्यांचा इतका छळ करण्यात आला की ते आठवून आजही मनाचा थरकाप होतो. या काळातील अत्याचारांवर आणि पोलीस तसेच प्रशासनाने दिलेल्या शिक्षांवर आधारित अनेक पुस्तके लिहिली गेली. मला देखील त्यावेळी ‘संघर्षमय गुजरात’ नामक पुस्तक लिहिण्याची संधी मिळाली होती. काही दिवसांपूर्वीच, आणीबाणीच्या विषयावर लिहिलेले आणखी एक पुस्तक माझ्या वाचनात आले त्याचे नाव आहे – TORCHER OF POLITICAL PRISONER IN INDIA. आणीबाणीच्या काळात छापण्यात आलेल्या या पुस्तकात, तत्कालीन सरकार, लोकशाहीच्या रक्षकांना किती क्रूरपणे वागवत होते याचे वर्णन करण्यात आले आहे. या पुस्तकात अनेक घटनांचे अभ्यासपूर्ण विवेचन आहे, अनेक छायाचित्रे आहेत. माझी अशी इच्छा आहे की आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत, अशा वेळी देशाच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या अशा गुन्ह्यांची देखील नक्की माहिती करुन घ्या. त्यामुळे आजच्या तरुण पिढीला लोकशाहीचा अर्थ आणि त्याचे महत्त्व समजून घेणे अधिक सोपे होईल.”

‘भारताने २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त भारत बनवण्याचा संकल्प केला आहे. हा संकल्प नक्कीच खूप मोठा आहे. एक काळ असा होता की क्षयरोगाविषयी समजल्यानंतर कुटुंबातील सदस्य दूर निघून जायचे, पण आजच्या काळात क्षयरोगाविषयी समजले की कुटुंबातील लोकं रुग्णाची व्यवस्थित काळजी घेतात.’असे मन की बात मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रविवारी देशाला संबोधित केले.

बिपरजॉय चक्रीवादळाचा उल्लेख

बिपरजॉय चक्रीवादळाचा उल्लेख करत पंतप्रधानानी सांगितले की,’दोन ते तीन दिवसांपूर्वी देशाच्या पश्चिम भागामध्ये खूप मोठे चक्रीवादळ आले होते. गुजरातच्या कच्छ भागामध्ये बिपरजॉय चक्रिवादळामुळे खूप नुकसान झाले. परंतु कच्छच्या लोकांनी ज्या धैर्याने आणि सतर्कतेने या चक्रिवादाळाशी लढा दिला तो तितकाच अभूतपूर्व आहे.’

‘दोन दशकांपूर्वी झालेल्या भूकंपानंतर कच्छ कधीही सावरणार नाही असे म्हटले जात होते. परंतु आज हाच जिल्हा देशातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक आहे. मला खात्री आहे की कच्छचे लोक बिपरजॉय चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानातून लवकर सावरतील’, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.