वैजापूर शहरात ‘थर्ड आय’ च्या मदतीने निगराणी लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे

वैजापूर ,१८ जून/ प्रतिनिधी :-जिल्हा पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया व सहाय्यक पोलिस अधीक्षक महक स्वामी यांच्या संकल्पनेतून  वैजापूर शहरात वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. लोकसहभागातून बसविण्यात आलेल्या या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे पोलिसांना ‘थर्ड आय’ मिळाली असून पोलिसांना शहरातील घडामोडीवर व गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होणार आहे.

वैजापूर पोलिस ठाण्यात अगोदरच कर्मचाऱ्यांची कमी असल्याने संख्याबळ अभावी चोरी व लूटमारीच्या प्रमाणत मोठी वाढ झाली होती. कमी संख्याबळ असल्याने पोलिस कुठे कुठे लक्ष ठेवतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी वैजापूर पोलिस ठाण्याला दिलेल्या भेटी दरम्यान लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी सूचना केली होती. त्यांच्या संकल्पनेतून शहर व परिसरातील नागरिकांनी मदतीचा हात देत शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास सहकार्य केले अशी माहिती पोलिस निरीक्षक संजय लोहकरे यांनी दिली.

या सीसीटीव्ही कॅमेऱ्याने पोलिसांना आता थर्ड आयच्या मदतीने शहरातील मुख्य ठिकाणी निगराणी ठेवण्यात मदत होईल व शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने नक्कीच फायदेशीर ठरेल.