डॉ. चारुलता रोजेकर यांना यंदाचा ‘क्रीडा भारती योग पुरस्कार’

छत्रपती संभाजीनगर,१८ जून / प्रतिनिधी :- क्रीडा भारती या खेळासाठी समर्पित संघटनेचा ‘क्रीडा भारती योग पुरस्कार’ यंदा डॉ. चारुलता रोजेकर यांना जाहीर झाला आहे. २१ जून रोजी जगभरात साजरा केला जाणाऱ्या जागतिक योग्य दिनाच्या निमित्ताने हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती क्रीडा भारतीचे येथील प्रमुख पंकज भारसाखळे यांनी दिली. 

डॉ रोजेकर यांनी योग या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. याच बरोबर त्यांनी पत्रकारिता या विषयातही पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केले आहे. ५२ हजार लोकांना त्यांनी आतापर्यंत आपल्या परिश्रमातून योग्य साक्षर केले आहे. याशिवाय त्यांनी योग विषयाच्या प्रचार प्रसारासाठी रेडियोवर ५५० पेक्षा अधिक भाषणे केली आहेत. याशिवाय १२०० पेक्षा अधिक लेखही डॉ. रोजेकर यांचे प्रसिद्ध झाले आहेत. 

हरसूल कारागृहातील कैद्यांसाठी योग अभ्यास वर्ग घेणाऱ्या त्या एकमेव योग शिक्षिका आहेत. समाजातील विविध घटकांसाठी त्यांनी योग्य वर्ग घेतले ज्याचा उपयोग त्यांना सामान्यांच्या दैनंदिन आयुष्यात बदल घडविण्यास झाला आहे. गर्भधारणा झालेल्या महिलांसाठी घेतल्या जाणाऱ्या त्यांच्या ‘गर्भसंस्कार’ वर्गाला मोठी पसंती मिळाली आहे. यातुन अनेक महिलांना गर्भधारणा आणि बाळंतपण सुलभ होण्यास मदत झाली आहे. 

अकरा हजार रुपये, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार मंगळवार (ता. २०) रोजी हेडगेवार रुग्णालयातील दामूअण्णा दाते सभागृह येथे प्रदान केला जाणार आहे.