करंजगाव येथील जिल्हा परिषद शाळा मोडकळीस

वैजापूर ,​९​ जून/ प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील करंजगाव येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळेतील नऊपैकी पाच खोल्या अक्षरशः मोडकळीस आल्या आहेत.  शाळा सुरु होण्यास काही दिवसांचा केवळ एक आठवड्याचा कालावधी शिल्लक असल्याने पडक्या वर्गखोलीत विद्यार्थी कसे ज्ञानार्जन करणार असा प्रश्न आहे.

याबाबत शालेय समितीच्या उपाध्यक्ष शैला मोकळे, रविंद्र मोकळे, विलास घोडके, दादासाहेब घोडके, विजय मोकळे, सतीश रावते, गणेश मगर आदींनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग, पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, बांधकाम विभाग यांच्याकडे मागील दोन वर्षांपासुन निवेदन देऊन पाठपुरावा सुरु केला आहे. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अद्याप कुठलीही कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी शाळेला कुलुप लावण्याचा इशारा दिला आहे.

करंजगाव येथील प्राथमिक शाळेत जवळपास २०० विद्यार्थी शिक्षण घेत असुन या शाळेत नऊ वर्ग खोल्या आहेत. मात्र यातील पाच वर्ग खोल्या धोकादायक झाल्या आहेत. करंजगाव येथील शाळेचे मुख्याध्यापक व शालेय शिक्षण समितीने २०२१ मध्ये जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागास शाळा खोली मंजुरीबाबत प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार, २०२२-२३ घ्या जिल्हा वार्षिक नियोजनामध्ये हा प्रस्ताव मंजुरीसाठी घेण्यात आला होता. तथापि, जिल्हा नियोजन समितीने २३-२४ च्या यादीतुन करंजगावच्या शाळेचा प्रस्ताव वगळला. हा प्रस्ताव कोणत्य कारणाने वगळला असा सवाल ग्रामस्थांनी केला असुन याबाबत कार्यवाही न झाल्यास चालु शैक्षणिक वर्षात शाळेला कुलुप लावुन छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करु असा इशारा दिला आहे. नुकत्याच झालेल्या चक्रीवादळासारख्या जोराच्या झंझावातामुळे शाळाखोल्यांचे पत्रे उडाले आहेत. अशा धोकादायक खोल्यांमध्ये विद्यार्थी कसे बसणार हा प्रश्न आहे.