वैजापूर पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची चर्चा ; गटविकास अधिकारी बोयनर फुलंब्रीला ?

वैजापूर ,​८ ​जून/ प्रतिनिधी :- वैजापूर पंचायत समिती कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची जोरदार चर्चा आहे.‌ गेल्या अनेक वर्षांपासुन पंचायत समितीच्या कृषि विभागात कृषि अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले व सध्या गट विकास अधिकारी यांचा पदभार सांभाळणारे हणमंत बोयनर यांची बदली फुलंब्री येथे झाल्याची खात्रीलयक माहिती हाती आली आहे. तर कृषि अधिकारी एस.एन.मुसने यांची सिल्लोड येथे बदली झाल्याची चर्चा आहे.

यासोबतच अन्य विभागातील काही कर्मचाऱ्यांची सुद्धा बदली झाल्याचे संकेत आहेत. मात्र बोयनर यांच्या बदलीची चर्चा अधिक रंगली आहे. बोयनर हे समाजाभिमुख व्यक्तिमत्व असून कुशल कार्यशैलीमुळे ते प्रशासनासोबतच सर्वसामान्यांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत.‌ गटविकास अधिकारी  विठ्ठल हरकल हे सेवानिवृत्त झाल्यानंतर कृषि अधिकारी बोयनर यांच्याकडे पदाचा कार्यभार सोपवण्यात आला. त्यानंतर पंचायत समितीला नियमित गटविकास अधिकारी दर्जाचा अधिकारी मिळाला नसून त्यांची जबाबदारी बोयनर हे यशस्वीपणे सांभाळत आहेत. मात्र, आता त्यांची बदली झाल्याने बीडीओचा पदभार कोण सांभाळणार असा प्रश्न आहे.‌ तथापि, नियमित अधिकारी मिळेपर्यंत बोयनर हेच बीडीओचा पदभार सांभाळणार असून नियमित अधिकारी मिळाल्यानंतरच बोयनर यांना येथून पदमुक्त केले जाण्याची शक्यता आहे.