वैजापूर तालुक्यात कृषी विभागातर्फे खरीपाचे नियोजन ; मशागतीची कामे आटोपून शेतकऱ्यांची बी- बियाणे खरेदीसाठी लगबग

वैजापूर ,​८ ​जून/ प्रतिनिधी :- जून महिना उजाडल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक पेरणी करण्यासाठी पावसाचे वेध लागले आहेत. मशागतीची कामे आटोपून बी-बियाणांची व खतांची निवड यामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी मशागतीची कामे आटोपून शेत नांगरले असून लागवडीची तयारी केली आहे. शेतीसाठी महत्वाचे नक्षत्र असलेल्या मृग नक्षत्राची सुरुवात झाली आहे. या नक्षत्रात चांगला पाऊस पडला तर तो शेतीसाठी अतिशय उपयुक्त असतो अशी मान्यता आहे. त्यामुळे  पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर लगेचच शेतात पिकांची लागवड करण्यासाठी बळीराजा सज्ज झाला आहे. दुसरीकडे कृषि विभागानेही खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. 

वैजापूर तालुक्यात खरीप हंगामात कापूस, मका, बाजरी, सोयाबीन, भुईमुग, युग, तुरे उडीद या पिकांची प्रामुख्याने लागवड केली जाते. यात कापसाचे क्षेत्र सर्वाधिक असुन त्यापाठोपाठ मका व बाजरी, सोयाबीन व अन्य पिकांची लागवड केली जाते. वैजापूर तालुक्यात या खरीप हंगामात कपाशीचे क्षेत्र घटणार असुन मकाच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याचा अंदाज कृषि विभागाने व्यक्त केला आहे. तालुक्यात कपाशीचे सरासरी पेरणी क्षेत्र ६७ हजार ७२७ हेक्टर असुन यंदा ६९ हजार ८६५ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येण्याची शक्यता आहे. मक्याचे क्षेत्र ३७६२२ हेक्टर असुन यावर्षी मक्याच्या क्षेत्रात वाढ होऊन जवळपास ४१ हजार हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची पेरणी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे बाजरी-३२३९ हेक्टर, सोयाबीन-४०१६ हेक्टर, भुईमुग- २४५० हेक्टर, मुग-२९७६ हेक्टर, तुर-२१३४ हेक्टर व उडीद-१७९ हेक्टर याप्रमाणे पिकांची लागवड होणार आहे. कृषि विभागाने कपाशीच्या ६५ हजार हेक्टर क्षेत्रासाठी ३.२५ लाख बियाणांची पाकिटे व मकाच्या ४५ हजार हेक्टरवरील लागवडीसाठी सहा हजार ७५० क्विंटल बियाण्यांचे नियोजन केल्याची माहिती उपविभागीय कृषि अधिकारी अशोक आढाव यांनी दिली. युरिया, डीएपी, एएसपी, एमओपई यासह संयुक्त खते अशा ५८ हजार ४११ में. टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली असून त्यापैकी ५१ हजार ८९७ में.टन खतांचे आवंटन मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. यात १७ हजार टन युरिया मंजुर झाला असल्याने यंदा जास्त मागणी असलेल्या युरियाचा टंचाई भासणार नाही. पीक उगवणईनंतर शेतकऱ्यांनी नॅनो युरियाचा वापर करावा जेणेकरुन प्रदुषण कमी होऊन युरियाचा योग्य वापर होईल व पाण्याद्वारे उघडुन जाणाऱ्या युरिया मुळे होणारे नुकसान टाळता येईल असे कृषी अधिकारी आढाव यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी पिकांच्या जोमाने वाढीसाठी बीजप्रक्रिया करावी व कीटकनाशकांची वेळेवर फवारणी करावी असे आवाहन त्यांनी केले.