वैजापूर शहरात 2 लाख रुपये किंमतीचा गुटखा पकडला ; तीन जण ताब्यात

सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी यांची कारवाई

वैजापूर ,​३​ जून/ प्रतिनिधी :- 
वैजापूर उपविभागाच्या सहाय्यक पोलिस अधीक्षक महक स्वामी यांनी धडाकेबाज कारवाई करत शहरातील देशपांडे गल्ली येथील एका घरावर छापा टाकून दोन लाख रुपये किमतीचा गुटखा साठा हस्तगत केला. ही कारवाई शनिवारी (ता.03) दुपारी तीन वाजेच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी वडील व मुलासह तीन जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विजय चंदन हिरण, सय्यम विजय हिरण व शेख जावेद शेख शब्बीर तिघेही राहणार वैजापूर अशी आरोपींची नावे आहेत.

राज्य सरकारने बंदी घातलेल्या गुटख्याची शहरात बिनधास्तपणे विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक श्रीराम काळे, उपनिरीक्षक पवन राजपूत, हेड कॉन्स्टेबल गोलवाल, पोलिस नाईक आत्माराम पैठणकर, संजय घुगे, गोपाल जानवाल, दिनेश गायकवाड यांच्या पथकाने देशपांडे गल्ली येथील विजय हिरण याच्या घरावर छापा मारला. या छाप्यात पोलिसांना चोरट्या मार्गाने विक्री करण्यासाठी ठेवलेला गुटख्याचा मोठा साठा आढळून आला. या साठ्याची अंदाजे किंमत दोन लाख असून हिरण याने या साठ्यात शेख जावेद शेख शब्बीर याचीही भागीदारी असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी सर्व साठा हस्तगत केला असून तिघांनाही ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.