ओडिशात रेल्वेचा भीषण अपघात; कोरोमंडल एक्स्प्रेसने मालगाडीला दिलेल्या घडकेत १००​ प्रवाशांचा मृत्यू

बालासोर(ओडिशा) :– ओडिशातील बालासोर येथे कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी यांचा बहनगा स्टेशनजवळ संध्याकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी या दोन्ही गाड्या एकाचवेळी एकाच रुळावर आल्याने हा अपघात झाला. कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला जोर धडक बसली. त्यानंतर रेल्वेचे काही डब्बे रुळावरून घसरले. प्रशासनाने अपघाताबाबत आपत्कालीन नियंत्रण कक्ष क्रमांक 6782262286 जारी केला आहे. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार १७९ प्रवासी जखमी तर १००​ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

बालासोरमधील बहनगा स्टेशनजवळ शुक्रवारी संध्याकाळी हा अपघात झाला. एक्स्प्रेस आणि मालगाडी यांच्यात झालेली धडक इतकी भीषण होती की, कोरोमंडल एक्स्प्रेस रुळावरून उतरली. या अपघातात जीवितहानी झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर, एक्स्प्रेसचे डब्बे पलटल्याने काही प्रवासी अडकले असल्याचे म्हटले जात आहे. सध्या या मार्गावरून जाणारी रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे.

विशेष मदत आयुक्त कार्यालयाने माहिती दिली की, अपघातस्थळी शोध आणि बचाव कार्यासाठी पथके घटनास्थळी पोहोचली आहेत. त्याचबरोबर बालासोरच्या जिल्हाधिकार्‍यांनाही सर्व आवश्यक व्यवस्था करण्यासाठी घटनास्थळी पोहोचण्यास सांगण्यात आले असून राज्यस्तरावरून काही अतिरिक्त मदतीची आवश्यकता असल्यास एसआरसीलाही कळविण्यात आले आहे. याशिवाय रेल्वे रुळावरून डब्बे हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचवेळी, एका रुळावर दोन गाड्या कशा आल्या याचा तपासही रेल्वेने सुरू केला आहे.

ओडिशामध्ये तीन ट्रेन धडकल्या! मुख्य कारण उघडकीस

आता एकाच रुळावर दोन गाड्या कशा येतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामागचे मुख्य कारण काय समोर आले आहे.

शुक्रवारी संध्याकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात इतका भीषण आहे की, रेल्वेचे अनेक डब्बे अक्षरशः कापले गेले आहेत. दोन एक्सप्रेस आणि एक मालगाडी अशा तीन गाड्यांमध्ये हा अपघात झाला आहे. सुरुवातीला एक ट्रेन रुळावरुन घसरली त्यानंतर त्यावर दुसरी गाडी आदळली आणि त्यांना दुसऱ्या रुळावरुन धावणारी मालगाडी धडकली, अशी माहिती ओडिशाच्या मुख्य सचिवांनी दिली.

एका रुळावर दोन गाड्या कशा येतात…

यामागे दोन कारणे आहेत. पहिली मानवी चूक आणि दुसरी तांत्रिक चूक. या अपघातामागे तांत्रिक बिघाड असल्याचे अद्याप मानले जात आहे. सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने दोन गाड्या एकाच रुळावर आल्या आणि त्यांची टक्कर झाली. वास्तविक, ड्रायव्हर कंट्रोल रूमच्या सूचनेनुसार ट्रेन चालवतो आणि ट्रॅकवरील ट्रॅफिक पाहून कंट्रोल रूमकडून सूचना दिल्या जातात. यासाठी प्रत्येक रेल्वे कंट्रोल रूममध्ये एक मोठा डिस्प्ले बसवलेला असतो. त्या डिस्प्लेवर कोणत्या ट्रॅकवर ट्रेन आहे आणि कोणता ट्रॅक रिकामा आहे हे दिसते. हे हिरव्या आणि लाल रंगाच्या दिव्यांद्वारे दाखवले जाते. उदाहरणार्थ, जर एखाद्या ट्रॅकवर ट्रेन धावत असेल तर ती लाल दर्शवेल आणि जो ट्रॅक रिकामा असेल तो हिरवा दर्शवेल. हे पाहून नियंत्रण कक्षाकडून लोको पायलटला सूचना दिल्या जातात. मात्र यावेळी या अपघाताची गंभीरता पाहून वाटते की डिस्प्लेवर ट्रेनचा सिग्नल बरोबर दाखवला गेला नाही आणि त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला.