भाजप देशभरात ‘संपर्क से समर्थन’ अभियान राबविणार – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

डॉ.कराड व राज्यसभा खासदार सैनी यांची वैजापुरात पत्रकार परिषद

वैजापूर ,​२​ जून/ प्रतिनिधी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात सत्ता स्थापन केल्यापासून मागील नऊ वर्षात देशात सर्वच क्षेत्रात अमुलाग्र बदल झाले आहेत. देशात विकासाचे वारे वाहत असून संपूर्ण देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक बांधणी करण्यासाठी विधानसभा व लोकसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून यात एक हजार मतदारांच्या भेटीगाठी घेऊन ‘संपर्क से समर्थन’ अभियान राबविण्यात येणार आहे‌. अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड व राज्यसभा खासदार कल्पना सैनी (उत्तराखंड) यांनी ही माहिती दिली.

वैजापूर येथील बाजार समितीच्या सभागृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेला भाजपाच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य एकनाथ जाधव, जिल्हाध्यक्ष विजय औताडे, जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी, तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे, बाजार समितीच्या उपसभापती शिवकन्या पवार, बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर जगताप, डॉ. राजीव डोंगरे, महिला आघाडीच्या कल्पना पवार, कैलास पवार, प्रेम राजपूत, दिनेश राजपूत, शैलेश पोंदे प्रभाकर गुंजाळ, सुरेश राऊत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. या पत्रपरिषदेमध्ये डॉ. कराड यांनी पंतप्रधान मोदी यांनी मागील नऊ वर्षात केलेल्या विविध विकास कामांचा उल्लेख करत सेवा, सुशासन व गरीब कल्याण हेच पक्षाचे धोरण असल्याचे सांगितले. २० ते ३० जून या कालावधीत भूपेंद्र यांच्यासह खासदार कल्पना सैनी या लोकसभा व विधानसभा क्षेत्रात दौरा करणार आहेत. या काळात बुथ स्तरीय लाभार्थी संमेलन, कार्यकर्ता संमेलन, व्यापारी संमेलन, तसेच मोर्चा संमेलन असे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. २२ जून रोजी प्रत्येक बुथवर योगाचा कार्यक्रम घेण्याचे नियोजन असून २३ जून रोजी श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त अभिवादन करण्यात येईल. २५ जून रोजी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केल्याने हा दिवस भाजपातर्फे काळा दिवस म्हणून पाळण्यात येणार असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले‌. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याण दांगोडे यांनी केले.