हमरापूर शिवारात शेतवस्तीवर दरोडा टाकून पसार झालेल्या दोन दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश

वैजापूर, २४ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-दोन नोव्हेंबर रोजी वैजापूर तालुक्यातील हमरापूर शिवारातील शेतवस्तीवर धुमाकुळ घालत धारदार हत्यारा़ंचा धाक दाखवून रोख मारहाण करत रोख  रक्कम व सोन्या चांदीचे दागिने असा जवळपास दोन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या टोळीतील दोघांना औरंगाबाद येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. संतोष डिस्चार्ज उर्फ सुर्यभान काळे व रवि उर्फ रविंद्र मुबारक भोसले (रा.‌अंतापूर, ता.‌गंगापूर) अशी त्यांची नावे आहेत.

दोन नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास हमरापूर शिवारातील भाऊसाहेब गायकवाड यांच्या शेतवस्तीत दरवाजा तोंडुन घुसले व त्यांनी कोयता, चाकु, गज व काठ्यांचा धाक दाखवला. तसेच त्यांचे आई वडील व भाऊ यांना मारहाण केली होती. तसेच त्यांच्या घराशेजारील कमलाबाई वाघ यांच्याही घरात जाऊन मारहाण केली. रोख रक्कम व दागिने असा एक लाख ३४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. त्यानंतर शेषराव चौधरी यांच्या घरातुनही रोख रक्कम व दागिने असा ४४ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरला.

याप्रकरणी विरगाव पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिस अधीक्षक  मनीष कलवानिया, अप्पर पोलिस अधीक्षक  सुनिल लांजेवार व सहायक पोलिस अधिक्षक महक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव, हेड कॉन्स्टेबल श्रीमंत भालेराव, नामदेव शिरसाठ, संतोष पाटील, वाल्मिक निकम, विजय धुमाळ, उमेश बकले, रामेश्वर धापसे, ज्ञानेश्वर मेटे, राहुल गायकवाड, योगेश तरमाळे व जीवन घोलप यांच्या पथकाने समांतर तपास व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दोघांना अटक केली. त्यांनी दोन्ही गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.