मंचर मधील लव्ह जिहाद  घटना :  महिला अत्याचाराबाबत राष्ट्रवादीची भूमिका धर्मानुसार ठरते का?

भाजपा प्रदेश  मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा परखड सवाल

मुंबई, २ जून    / प्रतिनिधी :-मंचर येथील ‘लव्ह जिहाद’ घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि खा. सुप्रिया सुळे यांची भूमिका धर्माच्या आधारावर ठरते का , असा परखड सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष वर्षा भोसले ,मुंबई भाजपा उपाध्यक्ष अमरजित मिश्र आदी उपस्थित होते. राजकारणाच्या पलिकडे जाऊन या घटनेचा निषेध करण्याची  भूमिका घेण्याचे धाडस राष्ट्रवादी कॉंग्रेसने आता तरी दाखवावे, असेही श्री . उपाध्ये यांनी सांगितले.   

श्री . उपाध्ये म्हणाले की ,पुणे जिल्ह्यातील मंचर येथील ‘लव्ह जिहाद’ च्या घटनेला आठवडाभरापूर्वी भाजपा आ. गोपीचंद पडळकर यांनी वाचा फोडली. ‘लव्ह जिहाद’ ची घटना उघड होऊन सात आठ दिवस लोटले तरी ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायद्याला विरोध करणा-या राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि त्यांच्या नेत्यांनी याबाबत चकार शब्द काढला नाही. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यांच्याच तालुक्यातील तरुणीसोबत हा प्रकार घडून सुद्धा ब्र देखील काढला नाही.राज्यात ‘लव्ह जिहाद’ वगैरे काही घडत नाही,असं ठासून सांगणाऱ्या खा. सुप्रियाताई सुळे यांनीही या घटनेबाबत प्रतिक्रीया व्यक्त केलेली नाही. हाथरस तसेच इतर महिला अत्याचाराच्या घटनांबाबत तातडीने व्यक्त होणा-या सुप्रियाताईंनी या घटनेबाबत मात्र मौन पाळले आहे. आता तरी त्यांनी मौन सोडून ठाम भूमिका मांडावी असे श्री. उपाध्ये म्हणाले. मंचर च्या घटनेत अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवण्यात आले. तिचे लैंगिक शोषण करण्यात आले ,बळजबरीने गोमांस खायला लावले गेले, बुरखा घालण्याची सक्ती केली गेली. हे लव्ह जिहाद नाही तर काय आहे ? हिंदू समाज एकवटून लव्ह जिहाद विरोधी मोर्चे काढत असताना याच सुप्रियाताईंनी मोर्चाची खिल्ली उडवली होती याचे स्मरण श्री. उपाध्ये यांनी करून दिले.  

राज्याचे माजी  गृहमंत्री असलेल्या वळसे पाटील यांनी पीडित मुलीची व तिच्या कुटुंबीयांची भेट घेण्याचे सौजन्यही दाखविले नाही. मंचर सारख्या लव्ह जिहाद च्या घटनांकडे  राजकीय फायद्या तोट्याची गणिते बाजूला ठेवून पहायला हवे. असेही श्री . उपाध्ये यांनी नमूद केले.