पोलिस उपनिरीक्षकांवर कारवाईसाठी बसपाचे उपोषण

वैजापूर ,३० मे/ प्रतिनिधी :-वैजापूर पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस उपनिरीक्षक यांच्यावर एका प्रकरणात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावे या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी बाबासाहेब पगारे यांनी मंगळवारी (ता.30) येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले.

ही कारवाई करण्यासाठी बहुजन समाज पक्षाने यापूर्वी पोलिस निरीक्षक संजय लोहकरे यांना निवेदन दिले होते. त्यावेळी त्यांनी या प्रकरणी चौकशी समिती नेमून कार्यवाही करू असे आश्वासन दिले होते. परंतु एक ते दीड महिना उलटूनही यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही त्यामुळे त्यांच्या कर्तव्याबाबत संशय येत असल्याचा आरोप पगारे यांनी वैजापूर उपविभागाच्या सहाय्यक पोलिस अधीक्षक महक स्वामी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. पगारे यांच्यासोबत अंकुश पठारे, जीवन पठारे, श्रीकांत जाधव, जाकिर पठाण, बाळासाहेब त्रिभुवन, सलीम पठाण यांनी उपोषणात सहभाग नोंदवला.