खंडाळा गावाजवळील पुलाच्या कामात चूक अपघात वाढले ; अधिकाऱ्यांकडून दुरुस्तीचे आदेश

वैजापूर,२० डिसेंबर /प्रतिनिधी :- वैजापूर – शिऊर बंगला (एन.एच.752) या राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा येथील बोर नदीवर बांधण्यात आलेला पूल हा मृत्यूला आमंत्रण देणारा ठरला असून, या पुलावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या पुलावर अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.पुलाच्या चुकीच्या बांधकामामुळे अपघात होऊन जीवित हानी होत असल्याने याप्रकरणी ग्रामस्थाच्या तक्रारीवरून संबंधितांविरुद्ध वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल होताच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता व संबंधित ठेकेदार यांनी तात्काळ खंडाळा जवळील बोर नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाची पाहणी करून ग्रामस्थांशी चर्चा केली व पुलावर बांधण्यात आलेली भिंत तोडून दोन्ही बाजूला डिव्हायडर बनविण्याचे आदेश दिले.
पुलाच्या बांधकाम रचनेत झालेल्या चुकांमुळे अपघात होऊन अनेक निष्पाप व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला यास संबंधित ठेकेदार व अभियंता जबाबदार असून पूल व रस्त्याच्या चुकीच्या कामामुळे वडील समाधान गोविंद अहिरे(वय-43 रा.भोपेवाडी, तालुका कन्नड) हे दुभाजकला धडकून त्यांचा अपघाती मृत्यू झाला त्यांच्या मरणास कारणीभूत राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता व  ठेकेदार गंगामाई कंट्रक्शन हे जबाबदार असल्याची तक्रार वाल्मीक समाधान अहिरे याने दिल्यावरून वैजापूर पोलीसात संबंधित अभियंता व ठेकेदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

गुन्हा दाखल होताच शनिवारी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता बी.एम.थोरात, यांच्यासह कार्यकारी अभियंता पी.आर.सोनवणे, गंगामाई कन्स्ट्रक्शनचे प्रकल्प व्यवस्थापक डी.,एम.सातपुते, उपव्यवस्थापक व्ही.बी.खडके यांनी खंडाळा येथे येऊन पुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांनी पुलाच्या कामाविषयी प्रश्न उपस्थित करून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले पुलाचे कामाचे यापूर्वी योग्य पद्धतीने बांधकाम केले असते तर या निष्पाप लोकांचे बळी गेले नसते, जर या पुलाची योग्य पद्धतीने रचना केली गेली नाही तर ग्रामस्थांच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संबंधित अधिकाऱ्यांना दिला. अधीक्षक अभियंता बी. एम.थोरात यांनी ग्रामस्थांना आश्वासन देत दोनच दिवसात या फुलाची योग्य पद्धतीने दुरुस्ती केली जाईल असे सांगून पुलावर बांधण्यात आलेली भिंत तोडून व दोन्ही बाजूने डिव्हायडर बनविण्याची सूचना ठेकेदार व संबंधित अभियंता यांना केली. कार्यकारी अभियंता पी.आर.सोनवणे, टीम लीडर डिझाईनर लंगावार, ब्रिज इंजिनियर चंदनशिवे, मॅनेजिंग डायरेक्टर दंडवते, देखरेख अभियंता रमेश कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.