वैजापूर-गंगापूर तालुक्यासाठी नांदूर मध्यमेश्वर कालव्यातून पिण्यासाठी पाणी सोडले

चारशे क्यूसेसने पाणी सोडले ; 18 ते 21 दिवसांचे पाणी आवर्तन

वैजापूर ,१० मे  / प्रतिनिधी :- मराठवाड्यातील वैजापूर व गंगापूर या दोन तालुक्यांना सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी अतिशय उपयुक्त असलेल्या नांदुर मधमेश्वर जलदगती कालव्यातुन मंगळवारी सकाळी पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची आवश्यकता भासणाऱ्या गावांची तहान भागणार आहे.

चारशे क्युसेक या निसर्गाने सुरुवातीला कालव्यात पाणी सोडण्यात आले असुन टप्प्याटप्प्याने 800 क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. या आधी मार्च महिन्यात सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले होते. साधारणपणे 18 ते 21 दिवस पाण्याचे आवर्तन सुरु राहणार आहे. बुधवारी, सायंकाळपर्यंत बेलगाव येथे वैजापुरच्या हद्दीत हे पाणी पोहचणार असुन त्यानंतर रोठी, नगिनापिंपळगाव, फकिराबादवाडी, कापुसवाडगाव, नादी, विरगाव, सटाणा, म्हस्की, हनुमंतगाव, जातेगाव, कऊटगाव, वरखेड मार्गे गंगापूर तालुक्यात दाखल होईल. गंगापूर तालुक्यात साधारणपणे आठ दिवस वितरिका सुरु राहणार असुन त्यानंतर वैजापूर व गंगापूर तालुक्यात कालव्याचे पाणी वितरित करण्यात येईल. या आवर्तनामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.