सुशांतची हत्या झाली होती…

कूपर रुग्णालयातील शवविच्छेदन करणाऱ्या कर्मचाऱ्याचा दावा

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली नव्हती तर त्याची हत्या झाली होती, असा धक्कादायक खुलासा कूपर रुग्णालयातील शवविच्छेदन करणाऱ्या कर्मचाऱ्याने केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सुशांतच्या मृत्यूनंतर अडीच वर्षांनंतरही या प्रकरणावरून राज्य सरकार आणि विरोधक पुन्हा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला ‘AU’ नावाने ४४ कॉल आल्याचे लोकसभेत सांगितले. ‘AU’ म्हणजे आदित्य ठाकरे, असा दावा राहुल शेवाळेंनी केल्याने एकच खळबळ उडाली होती. अशातच सुशांतच्या शवविच्छेदनावेळी पोस्टमॉर्टम करणारे रूपकुमार शाह यांनी हा दावा केला आहे.

ते म्हणाले, “सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला तेव्हा आमच्याकडे ५ ते ६ मृतदेह शवविच्छेदनासाठी आले होते. त्यामध्ये एक आत्महत्या केलेला व्हीआयपी मृतदेह आला होता. जेव्हा तो मृतहेद शवविच्छेदन करण्यासाठी टेबलवर घेतला तेव्हा, तो सुशांतसिंह राजपूतचा असल्याचे कळले. सुशांतच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आणि गळ्यावर दोन व्रण होते, हातापायावर मार लागून तुटल्यासारख्या खुणा होत्या. त्याची व्हिडीओ शूटींग करायला हवी होती, असे आमचे म्हणणे होते. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फक्त फोटो काढायला सांगितले. आम्ही आमच्या वरिष्ठांना सांगितले की, ही हत्याच वाटत आहे. त्यापद्धतीने त्यावर काम करावे, पण वरिष्ठ म्हणाले तत्काळ शवविच्छेदन करुन मृतदेह द्यायचा आहे,” असा दावा शाह यांनी केला आहे.

“गळफास घेतेलल्या आणि खून झालेल्या मृतदेहात खूप फरक असतो. त्याच्या गळ्यावरती असलेले व्रण हत्या केल्यासारखे दिसत होते. अंगावर मारहाणीचे व्रण दिसत होते. असे व्रण हा आत्महत्या करण्यात आलेल्या व्यक्तीच्या अंगावर नसतात,” असेही शाह यांनी म्हटले आहे.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा १४ जून २०२० रोजी वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरात आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळला होता. मुंबई पोलीस, ईडी, सीबीआय आणि एनसीबी या सर्व तपास यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी केली होती. चौकशीअंती सुशांतची हत्या नाही, तर आत्महत्याच होती, असा निर्णय अधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र आता शवविच्छेदन करणा-यानेच दावा केल्याने हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे.