माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेत केल्या या मागण्या:हिवाळी अधिवेशनाआधी पायऱ्यांवर सत्ताधारी विरुद्ध विरोधक

नागपूर ,२६ डिसेंबर/ प्रतिनिधी :- नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात विधान परिषदेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार टीका केली. महाराष्ट्र-कर्नाटक वादावर त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेले आहेत, असे सांगताच ते आक्रमक झाला आणि म्हणाले, “विधानसभेत आणि विधान परिषदेत सीमावादावत प्रस्ताव मांडायचे सोडून त्यांना दिल्लीत जाण्याची गरज होती का? दिल्लीमध्ये जाऊन मुख्यमंत्री सिमाप्रश्न मांडणार का?” असा सवाल उपस्थित केला.

पुढे ते म्हणाले,” एकीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे सातत्याने आक्रमक भूमिका घेत आहेत, तर इकडे आपले मुख्यमतनरी एकनाथ शिंदे हे सीमावादावर एक शब्ददेखील काढत नाहीत. महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागात मराठी माणसांवर अत्याचार सुरू आहे. जेव्हा तेथील ग्रामपंचायतींनी महाराष्ट्रात जाण्याचा ठराव संमत केला, तेव्हा त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. एवढंच नव्हे तर, त्या ग्रामपंचायतीदेखील बरखास्त करण्यात आल्या. आपल्या देशात काय मोगलाई आहे का?” अशी टीका त्यांनी यावेळी केली. पुढे विधान परिषदेत त्यांनी सीमावादावर तोडगा काढण्यासाठी गेले असताना मोरारजी देसाई यांच्या गाडीवर हल्ला केल्याची आठवणही सांगितली.

हिवाळी अधिवेशनाआधी पायऱ्यांवर सत्ताधारी विरुद्ध विरोधक

नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याला सुरुवात झाली. याआधी सत्ताधारी आणि विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करून आपला निषेध नोंदवला. सत्ताधारी पक्षांनी दाऊदशी संबंधित महिलेला पाठिशी घालणाऱ्या युवासेनेच्या नेत्यावर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी हातात फलक घेऊन सत्ताधारी आमदारांनी विधान भवनाच्या पायरीवर जोरदार आंदोलन केले. तसेच, सत्ताधाऱ्यांकडून भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणादेखील दिल्या.

तसेच, महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरुन महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. कर्नाकटचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, शिंदे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, ‘खाऊन खाऊन ५० खोके, माजलेत बोके’, ‘निर्लज्ज सरकार, मिंधे सरकार’, ‘बोम्मईसमोर माना खाली घालणाऱ्या सरकार हाय हाय’, अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. दुसऱ्या आठवड्याची सुरुवात वादळी झाली असून आता या आठवड्यामध्ये दोघांची रणनीती काय असेल? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.