वैजापूर शहर व परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस

वैजापूर ,​४​ मे  / प्रतिनिधी :- वैजापूर शहर व परिसरात गुरुवारी (ता.04) दुपारी तीन वाजेच्या सुमारास अवकाळी पाऊस झाला. सुमारे अर्धा तास पावसाची रिपरिप सुरु होती. शहरासह ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडल्याचे वृत्त आहे. तिडी, हिंगोणी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. पावसामुळे विद्युत पुरवठा काही काळ खंडित झाला होता.

पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांची मोठी तारांबळ झाली आहे. रब्बी पिकांची काढणी झाली असली तरी अनेक शेतकऱ्यांचा उन्हाळी कांदा अजून शेतात आहे. तसेच काढून न ठेवलेल्या कांदा पिकालाही अवकाळीचा फटका बसला आहे.‌ अजून दोन तीन दिवस अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे त्यामुळे बळीराजा धास्तावला आहे‌.