पती व सासूने नव्हे तर प्रियकराने केला विवाहितेचा खून: माया आगलावे खून प्रकरणाचा पोलिसांनी लावला छडा

वैजापूर,२१ डिसेंबर / प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील शिऊर येथे शौचालयाच्या सेफ्टीक टँकमध्ये सापडलेल्या माया आगलावे या विवाहितेच्या खूनाचा उलगडा लावण्यात शिऊर पोलिसांना यश आले आहे. पती व सासूने नव्हे तर प्रियकराने मायाचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिऊर येथील माया दादासाहेब आगलावे (28 वर्ष) या विवाहितेचा मृतदेह घराच्या पाठीमागे असलेल्या शौचालयाच्या सेफ्टीक टँकमध्ये आढळून आला होता. माहेरच्या मंडळीच्या तक्रारीवरून पोलिसांनी मायाचा पती दादासाहेब आगलावे व सासू राधाबाई आगलावे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले होते. दरम्यान चौकशीत पोलिसांना खूनामागे कुणी तरी तिसरा असल्याचे निदर्शनास आले. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला असता गावातील ज्ञानेश्वर आगलावे याने अनैतिक संबंधातून मायाचा खून केल्याचे समोर आले. 

माया व ज्ञानेश्वर यांचे गेल्या सहा महिन्यांपासून अनैतिक संबंध होते. समाजात बदनामी करण्याची धमकी देऊन माया ज्ञानेश्वर कडे पैशाची मागणी करीत असे. सोमवारी (ता.19) पण मायाने ज्ञानेश्वरला फोन करून 20 हजार रुपयांची मागणी करत त्याला घरी बोलावून घेतले होते. ज्ञानेश्वर घरी येताच मायाने पैशाची मागणी करून बदनामी करण्याची धमकी दिली.त्यामुळे संतापलेल्या ज्ञानेश्वरने मायाचा गळा दाबून तिचा खून केला व तिने आत्महत्या केल्याचे भासविण्यासाठी तिचा मृतदेह घरामागील शौचालयाच्या सेफ्टीक टँकमध्ये टाकला होता. चोवीस तासाच्या आत पोलिसांनी खुनाचा उलगडा करून आरोपीला अटक केली. या कामगिरीबद्दल शिऊर पोलिसांचे कौतुक होत आहे.

पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, पोलिस उपअधीक्षक महक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.