महालगाव येथे गॅस सिलेंडरने पेट घेतला ; आगीच्या भडक्यात होरपळून एकाचा दुर्दैवी मृत्यू

वैजापूर ,१४ मार्च / प्रतिनिधी :- तालुक्यातील महालगाव येथे गॅस सिलेंडरने पेट घेतल्याने भडक्यात होरपळून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवार रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे,किसन रामभाऊ सपकाळ(वय ६० वर्ष) असे या दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे,याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहिती नुसार  महालगाव येथील रहिवासी असलेले किसन सपकाळ हे आपल्या घरी एकटे असताना त्यांच्या घरातील गॅस सिलेंडर लिक झाला व या घटनेत लीक झालेली गॅस ज्वलंत पदार्थाच्या संपर्कात आल्याने घरात मोठा भडका झाला,

आग लागल्यावर गावातील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला यासोबतच गस्ती वर असलेल्या वीरगाव पोलिसांनी देखील आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.आग विझल्यानंतर त्यांना सपकाळ हे भाजलेल्या अवस्थेत आढळले,पोलिसांनी त्यांना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना सकाळी तपासून मृत घोषित केले,या दुर्घटनेत सर्व संसार उपयोगी साधने देखील जळून खाक झाली आहे.

या प्रकरणी वीरगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार थोरात करीत आहे.किसन सपकाळ यांच्या पश्चात पत्नी भाऊ व भवजाई असा परिवार आहे.