बाजार समिती निवडणुकीत पंकजा मुंडे, खडसेंना धक्का;हरिभाऊ बागडे,जयंत पाटील,अशोक चव्हाणांनी गड राखला

महाविकास आघाडीच्या पॅनलला 81 बाजारसमित्यांवर विजय तर 48 बाजार समित्यांवर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या पॅनलकडे

छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) युतीने मिळवले स्पष्ट बहुमत

मुंबई,२९  एप्रिल / प्रतिनिधी :-  राज्यातल्या 147 बाजार समित्यांचे निकाल लागलेत. बाजार समित्यांच्या निवडणुका असल्या तरी सर्वच राजकीय पक्षांनी आपआपल्या पॅनलद्वारे चांगलीच ताकद लावली होती.दिग्गज मंत्री, नेते, आमदारांना जबर झटका बसला. दिगज्जांच्या पॅनलचा पराभव झालाय. भाजपच्या पॅनलनं 40 बाजार समित्यांवर विजय मिळवलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 7 बाजार समित्या मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 38 बाजार समित्यांवर विजय मिळालाय. काँग्रेसचं पॅनल 31 बाजार समित्यांमध्ये विजयी झालंय. तर ठाकरे गट 11 ठिकाणी आणि इतरांच्या वाट्याला 18 बाजार समित्या गेल्या आहेत. युती आणि आघाडीच्या पॅनलचा विचार केला तर, महाविकास आघाडीच्या पॅनलला 81 बाजारसमित्यांवर विजय मिळाला. तर 48 बाजार समित्यांवर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या पॅनलकडे गेल्यात.

बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे, नाशिक जिल्ह्यात मंत्री दादा भूसे, मंत्री विजयकुमार गावीत, एकनाथ खडसे या सारख्या नेत्यांना या निवडणुकीत धक्का बसला आहे. या नेत्यांच्या पॅनेलचा पराभ झाला आहे. काही ठिकाणी सत्तेसाठी निर्माण झालेल्या अभद्र युत्यांना सुद्धा मतदारांनी नाकारल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राज्यातील निकालामध्ये संमिश्र यश उमटलं आहे. विदर्भातील रामटेक, नागपूरमधील सुनिल केदार, आशिष जायस्वाल यांच्या अभद्र युतीला त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या पॅनलने केलेला पराभव चर्चेचा विषय ठरला आहे. चंद्रपुरात खासदार बाळू धानोरकर यांना मोठा धक्का बसला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या युतीने बाजी मारली. नगरमध्ये विखे पाटील गटाला बाळासाहेब थोरातांनी धक्का देत भोपळाही फोडू दिला नाही. 

छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) युतीने मिळवले स्पष्ट बहुमत

छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) पॅनलने १५ पैकी ११ जागा जिंकून महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला. मविआला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक अभिजित देशमुख यांच्यामुळे भाजप-शिवसेनेचा विजय सुकर झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालेले नव्हते. काँग्रेसचे संचालक फोडून भाजपने बाजार समितीची सत्ता मिळवली होती. यंदा मात्र भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.

बाजार समितीच्या १८ संचालक मंडळ निवडीसाठी ४७ उमेदवार रिंगणात उतरले होते. यासाठी २८ एप्रिल रोजी मतदान झाले होते. शनिवारी (२९ एप्रिल) मतमोजणी झाली. बाजार समितीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली होती. मात्र, भाजपने फोडाफोडी करून सत्ता मिळावली. या निवडणुकीतही आमदार हरिभाऊ बागडे यांनी राष्ट्रवादीचे अभिजित देशमुख यांना उमेदवारी देऊन मताचे गणितच बदलून एकहाती सत्ता मिळवली.

परळीत धनंजय मुंडे यांचा पंकजांना धक्का

परळी बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडेंचा गट विजयी झालाय. धनंजय मुंडे यांच्यासोबतच्या लढतीत भाजप नेत्या पंकजा मुंडेंना जबर धक्का बसला. 18 पैकी 18 जागा धनंजय मुंडे गटानं जिंकल्यात. अंबाजोगाई बाजार समितीतही धनंजय मुंडेंचीच सरशी आहे. पंकजा मुंडेंच्या गटाचा इथंही पराभव झाला. 18 पैकी 15 जागा धनंजय मुंडे गटाला मिळाल्या.

अशोक चव्हाण यांचा गड शाबूत

नांदेड  : भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेस आघाडीची  सत्ता कायम. 18 पैकी 15 जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी विजयी. काँग्रेस 13 तर 2 जागांवर राष्ट्रवादी विजयी. अशोक चव्हाण यांचा गड शाबूत. खा. प्रताप पाटील चिखलीकर यांना धक्का बसला आहे. भाजप-शिंदे गटाला धक्का. भाजपाला केवळ ३ जागा, तर पहिल्यांदा निवडणुक लढवबाऱ्या बीआरएसला भोपळा हाती आला आहे. 

काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदार संघातील भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेस राष्ट्रवादीने झेंडा फडकावलाय. काँग्रेस राष्ट्रवादी ला 15 जागांवर विजय मिळालाय. काँग्रेस ने 13 तर राष्ट्रवादीने 2 जागांवर विजय मिळवला. भाजपने 3 जागा खेचून आणल्या. अशोक चव्हाण यांचा मतदार संघ असलेल्या भोकर बाजार समितीची निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. अशोक चव्हाणांना शह देण्यासाठी भाजपने मोठी ताकद लावली होती. अशोक चव्हाणांनी या बाजार समितीसाठी पूर्ण वेळ देत व्युव्हरचना आखली होती. बी आर एस ने निवडणुकीत एंट्री घेत आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते. अखेर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी च्या पॅनल ने 15 जागा मिळवत बाजार समितीवर झेंडा फडकावला. भाजपला 3 जागांवर समाधान मानावे लागले. नवख्या असलेल्या बी आर एस ला एकही जागा मिळाली नाही. विजयानंतर काँग्रेस राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

मंत्री तानाजी सावंत यांच्या गटाला धक्का

धाराशीव जिल्ह्यात परंडा बाजार समितीत मंत्री तानाजी सावंत यांच्या गटाला धक्का बसला. मविआच्या पॅनलनं 18 पैकी 11 जागांवर विजय मिळवला.

काका पुतण्याच्या लढाईत संदीप क्षीरसागर यांची बाजी

बीडमध्ये काका पुतण्याच्या लढाईत पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्या गटानं काका जयदत्त क्षीरसागरांच्या गटाला धोबीपछाड दिला. 18 पैकी 15 जागा संदीप क्षीरसागर यांच्या गटानं जिंकल्या.बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमदार संदीप क्षीरसागरांनी काका जयदत्त क्षीरसागरांच्या चाळीस वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावलाय. आमदार संदीप क्षीरसागर यांनी 5 पक्षांची मोट बांधून काका विरोधात दंड थोपटले होते. आज कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल हाती आला. यामध्ये संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागरांना धोबीपछाड केले. या विजयानंतर संदीप यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केलाय. मागील 40 वर्षांपासून बीड कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची एक हाती सत्ता होती. ही निवडणुक मात्र प्रतिष्ठेची बनवून आमदार संदीप क्षीरसागर यांनी शिंदे गट, ठाकरे गट, भाजपा, शिवसंग्राम आणि राष्ट्रवादी पक्षाची मोट बांधून निवडणुकीला सामोरे गेले होते. आता यावरूनच संदीप क्षीरसागर यांनी काकांना निवडणुकीमध्ये धोबीपछाड केले आहे. त्यामुळे क्षीरसागर यांना हा मोठा धक्का मानला जातो आहे.

बीड केज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकी मुंदडा-आडसकर गटाला यश. केज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंदडा-आडसकर यांच्या ताब्यात. ग्रामपंचायत मतदार संघातील 4 पैकी 4 जागा बजरंग बप्पा सोनवणे यांच्याकडे तर केज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत 18 पैकी 14 जागा मुंदडा-आडसकर गटाचे सर्व उमेदवार विजयी.

हर्षवर्धन जाधव यांना पत्नीकडून धक्का

छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड बाजार समितीत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या गटाला त्यांच्याच, पत्नी संजना जाधव यांच्या गटानं 18 पैकी 15 जागा जिंकत धूळ चारली.

कन्नड कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी आमदार नितीन पाटील, संजना जाधव यांचे निर्विवाद वर्जस्व

. या निकालात शिवसेना (शिंदे) जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार नितीन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या संजना जाधव यांच्या शिवशाही शेतकरी विकास पँनलने १८ पैकी १६ जागेवर मोठ्या फरकाने विजय मिळवत बाजार समातीवर निर्विवाद वर्जस्व राखले आहे.

तर माजी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे जावई माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर पवार यांनी शेवटच्या क्षणापर्यंत कडवी झुंज देऊन भाजपला एक जागा खेचून आणत विजय मिळला. तर माजी सभापती प्रकाश घुले यांचा अल्प मताने पराभव झाला. तर हमाल- मापारी मतदारसंघावर मात्र शेख युसुफ शेख मुनीर या अपक्ष उमेदवारांनी आपला झेंडा रोवला.

उद्धव ठाकरे सेनेचे आमदार उदयसिंह राजपुत यांच्या पँनलला दारुण पराभव पत्कारावा लागला. बाजार समितीच्या ३ हजार २० मतदारापैकी २ हजार ९०३ मतदारांनी मतदान केले होते यात ६७७ मतदान अवैध झाले यामुळे अनेक विजयाच्या उंबरठ्यावर असलेल्या उमेदवारांचा पराभवास कारणीभूत ठरले.

औसा कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपाची सत्ता

औसा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये शिवसेनेला ठाकरे गटाला आपली सत्ता राखता आली नाही. भाजपाचे औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केलेल्या मोर्चेबांधणीला यश आले असून या ठिकाणी18 जागेवर भाजपाची एकहाती सत्ता आली आहे. 

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा एकहाती विजय 

आमदार अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख यांनी केलेल्या मोर्चे बांधणीला यश आलं आहे. भाजपाचे आमदार रमेश कराड यांचं त्यांना आव्हान होतं. भाजपातलं गटातटाचं राजकारण चांगलंच तापलं होतं. त्याचाच फटका भाजपाला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बसला आहे. 18 जागा एकहाती स्वतःकडे खेचत काँग्रेसने मोठा विजय मिळवला आहे.

उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एकत्रित विजय झाला आहे. या ठिकाणाहून महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडली होती. 18 जागापैकी तब्बल 17 जागेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने विजय मिळवला आहे. भाजपाकडून काँग्रेसमध्ये गेलेले शिवाजीराव हुडे यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक लढवली होती. 

शिंदे गटाकडून भाजपचाच पराभव;विजयकुमार गावित यांना मोठा धक्का

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिंदे गटाचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांनी एकहात्ती सत्ता काबीज केली आहे. भाजपाचे आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावितांच्या पॅनलला मोठ्या पराभवाचा धक्का बसला आहे. 18 पैकी एकाही जागेवर भाजपाला विजय मिळवता आला नाही. सर्व जागांवर शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. विजयाच्या या लाटेत डॉ. विजयकुमार गावित यांचे बंधु प्रकाश गावित यांचा देखील पराभव झाला आहे. तर भाजपाचे जिल्ह्यातील दिग्गज युवा नेते विक्रांत मोरे, रविंद्र गिरासे यांना देखील पराभवाचा धक्का बसला आहे. त्यामुळे नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्याकडे राखण्यात शिवसेना शिंदे गटाला यश आले आहे.

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती पाठोपाठ शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या पॅनलला पराभवाचा धक्का बसला आहे. शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीवर अभिजीत पाटील यांच्या शेतकरी विकास पॅनलने 14 जागांवर विजय संपादीत करत सत्ता काबीज केली आहे. तर विद्यमान सत्ताधारी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष दिपक पाटील यांच्या लोकशाही आघाडी पॅनलला अवघ्या तीन जागा मिळाल्या आहेत. शहाद्याचे आमदार राजेश पाडवी हे देखील दिपक पाटील यांच्याच समवेत होते. तर मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या बळीराजा पॅनलला अवघ्या एका जागेवर विजयाचे समाधान मानावे लागले आहे. शहाद्यातील तीनही पॅनल प्रमुख भाजपाशी निगडीत असल्याने एकमेकांमधील होत असलेल्या या लढतीने चांगलीच चुरस निर्माण झाली होती.