छगन भुजबळांच्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबतच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित दादा स्पष्टच बोलले

मुंबई ,२५ जून /प्रतिनिधी :-राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पद नको. पक्ष संघटनेत जबाबदारी द्या, असं वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी यावर आपलं मत व्यक्त केलं होतं. यानंतर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष पदावरु रस्सीखेच सुरु असल्याचं चित्र उभं राहीलं होतं. विरोधी पक्षनेते पद जर मराठा समाजाकडे असेल तर प्रदेशाध्यक्ष पद हे ओबीसी किंवा अन्य समुदायाला मिळावं, अशी मागणी भुजबळ यांनी केली होती. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहेत. आता छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

प्रदेशाध्यक्ष पद हे ओबीसी किंवा अन्य समुदायाला मिळावं, या भुजबळ यांच्या वक्तव्याविषयी अजित पवार यांना प्रश्न विचारला असता. त्यांनी भुजबळांनी का बोलू नये? छगन भुजबळ यांचा तो अधिकार आहे. उद्या सगळ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन जायचं असल्यास वेगवेगळ्या घटकांना प्रतिनिधित्व का मिळू नये? त्यामुळे छगन भुजबळ यांचं बरोबर आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

यावेळी अजित पवार यांना तुम्हाला प्रदेशाध्यक्ष पद मिळाल्यास एकहाती कारभार करता येईल का? असा प्रश्न विचाराल्यावर त्यांनी अरे बाबा, आम्ही एकत्र बसून बोलू. कोणत्याही पक्षातील नेत्यांला आपली मतं मांडण्याचा अधिकार लोकशाहीत असला पाहिजे. शेवटी पक्ष ठरवेल तोच अंतिम निर्णय असतो. परंतु तुमचं म्हणणं पक्षासमोर मांडायचं नाही, असं कसं चालेल? असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांनी पक्ष संघटनेत पद मिळण्याबाबत इच्छा व्यक्त केल्यानंतर छगन भुजबळ यांनी राज्यात ओबीसी समाज 54 टक्के आहे. तो समाज आपल्याबरोबर मोठ्या प्रमाणावर जोडला जाऊ शकतो. त्यासाठी इतर पक्षांनी ओबीसी अध्यक्ष नेमले आहेत. आमच्याही पक्षात धनंजय मुंडे, सुनिल तटकरे आणि जितेंद्र आव्हाड असे नेते आहे. असं भुजबळ यांनी म्हटलं होतं. तसेच मला जबाबदारी मिळाल्यास मीही काम करेल, अशी इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली होती.