मनसेचे उद्धव ठाकरेंना ८ प्रश्न

उद्धव ठाकरेंना जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो हे म्हणण्याचा अधिकार नाही

मुंबई : उद्धवजी… तुम्हाला ‘हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो’ हे म्हणण्याचा आणि बाळासाहेबांचा वैचारिक वारसा सांगण्याचा अधिकारच उरला नाही, असे ट्विट करत मनसेने एक पत्र उद्धव ठाकरेंना लिहिले आहे. या पत्रात मनसेने उद्धव ठाकरेंना ८ प्रश्न विचारले आहेत.

शिवसेनेत दोन गट पडल्याने यंदा इतिहासात पहिल्यांदाच सेनेचे दोन दसरा मेळावे होणार आहेत. यानिमित्ताने मनसेने उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. मनसेचे प्रवक्ते योगेश खैरेंनी हे पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे.

या पत्रात लिहिले आहे की, उद्धवजी, उद्या शिवतीर्थावर “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो” म्हणण्याआधी या प्रश्नांची उत्तरे द्या.

१. मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादी या बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विरोधी विचार असणाऱ्या पक्षांशी युती का केली?

२. पीएफआय सारखी संघटना पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देत असताना आपण काहीही न बोलता शांत का बसलात?

३. एमआयएम, सपा सारख्या पक्षांसोबत दोन चार मतांसाठी हातमिळवणी का केली?

४. सत्तेत असतानाही औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण का रोखले नाही?

५. मशिदीवरील भोंगे उतरले पाहिजेत हा बाळासाहेबांचा विचार असताना त्यासाठी केलेल्या आंदोलनात महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे का दाखल केले?

६. बाळासाहेबांचा जनाब असा उल्लेख करून त्यांच्या हिंदुत्ववादी प्रतिमेला डाग का लावलात?

७. अजान स्पर्धा आयोजित करून कुठल्या हिंदुत्वाची उभारणी केली?

८. आपलं सरकार जाणार हे दिसल्यावरच औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे, हे कसे सुचले?

साहजिकच या प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडे नसणार. त्यामुळे माझ्या जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो हे म्हणण्याचा आणि बाळासाहेबांचा वैचारिक वारसा सांगण्याचा तुम्हाला अधिकारच उरला नाही, असे म्हणत या पत्राची सांगता करण्यात आली आहे.

उद्या शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. पक्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच यंदा दोन दसरा मेळावे होणार आहेत. शिवसेनेचा म्हणजेच उद्धव ठाकरेंचा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे तर शिंदे गटाचा मेळावा एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बीकेसी मैदानावर होणार आहे.