‘मातोश्री’च्या अलमारीतील सांगाडे बाहेर काढण्याची फडणवीसांची धमकी

पवारांनी केले तर मुत्सद्देगिरी आणि शिंदेंनी केले तर गद्दारी कशी?

चंद्रपुर : अलमारीत सांगाडे असणाऱ्यांनी सावकारीचा आव आणू नये. सांगाडे बाहेर काढू, अशी थेट जाहीर धमकीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिली आहे.

परिवार वादावरुन देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार केला. उद्धव ठाकरेंना त्यांनी ट्विटमधूनच उत्तर दिलं होते. या ट्विटला मिळालेल्या पाठिंब्याने आजपर्यंतचे सर्व विक्रम तुटले आहेत असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंवर खोचक टीका केली. उद्धव ठाकरेंनी काय ते समजून घ्यावं असा सल्लाही त्यांनी दिला होता. विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, हे परिवार बचाव बैठकीला गेले आहेत. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, देवेंद्रजी एवढ्या पातळीवर येऊ नका परिवार तुम्हाला देखील आहे. तुमच्या परिवाराचे व्हॉटसअप चॅट बाहेर आले आहेत, बाहेर येत आहेत. आम्ही अजून त्यावर बोललो नाही. आम्ही जर तुमच्या परिवारावर बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल, वेगळी कोणती आसनं तुम्हाला झेपणार नाहीत, फक्त पडून राहावं लागेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.

या परिवार वादावरून दोघांमध्ये चांगलीच जुंपली असून फडणवीस यांनी आता उद्धव ठाकरेंना ‘मातोश्री’च्या अलमारीतील सांगाडे बाहेर काढण्याची जाहीर धमकीच दिली आहे. तसेच फडणवीस कोणाच्या भानगडीत पडत नाही आणि पडला तर सोडत नाही, असंही त्यांनी ठामपणे बजावले आहे. चंद्रपुरातील सभेत बोलताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले.

‘तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करू?

काल मी पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीला परिवारवादी म्हटले तर उद्धव ठाकरे यांना मिरची झोंबली. पण उद्धवजी, ‘तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करू?’ असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, मी काचेच्या घरात राहत नाही, तुम्ही राहता. त्यामुळे माझ्या नादी लागू नका.

परिवारवादी एकत्र आले ही मोदींची उपलब्धी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक उपलब्धी आहेत. पण सर्व परिवारवादी पक्ष एकत्र आणले, ही सुद्धा एक उपलब्धीच म्हणावी लागेल. या सर्व परिवारवादी पक्षांना चिंता कुटुंबाची. आणि ज्यांचा परिवार संपूर्ण देश आहे, ते आहेत नरेंद्र मोदी. बरे या बैठकीत ठराव काय झाला तर राहुल गांधी यांची दाढी करा आणि त्यांचे लग्न करा, अशी टीका सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पवारांनी केले तर मुत्सद्देगिरी आणि शिंदेंनी केले तर गद्दारी कशी?

हा कुठला न्याय : देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्रवादीला सवाल

चंद्रपुर : वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातून १९७८ मध्ये शरद पवार ४० आमदार घेऊन बाहेर पडले आणि भाजपसोबत मुख्यमंत्री झाले. त्यांनी केली तर ती मुत्सद्देगिरी आणि तेच शिंदे यांनी केले तर गद्दारी? हा कुठला न्याय, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना विचारला आहे.

केंद्रात मोदी सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त न्यू इंग्लिश स्कुल मैदान चंद्रपूर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर आणि इतरही नेते उपस्थित होते.

यावेळी फडणवीस म्हणाले, शिदें गटावर ठाकरे गट कायम बेईमानी अशी टीका करत असते. पण मला आश्चर्च वाटलं की, राष्ट्रवादीनेही गद्दारी म्हणून शिंदे गटाला डिवचलं. वो करे तो रासलीला, मै करू तो कॅरेक्टर ढिला, तशी अवस्था आहे. १९७८ मध्ये वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातून शरद पवार ४० आमदार घेऊन बाहेर पडले आणि भाजपसोबत मुख्यमंत्री झाले. हे सरकार दोन वर्ष चाललं. इंदिराजींनी ते सरकार बरखास्त केलं नसतं, तर पाच वर्ष चाललं असतं. तेव्हा त्यांनी केली तर ती मुत्सद्देगिरी आणि तेच शिंदे यांनी केले तर गद्दारी? हा कुठला न्याय, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

पुढे बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अडीच वर्ष तुम्ही १०० कोटींची वसुली करणारे, फेसबुकवर असलेले, घरी बसलेले सरकार पाहिले, आता खऱ्या अर्थाने जनतेचे सरकार आले आहे, असे सांगून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर सडकून टीका केली.

पुढे राहुल गांधी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर गेले, त्या अमेरिकेतील त्यांचे भव्य स्वागत संपूर्ण जगाने पाहिले आणि दुसरीकडे राहुल गांधी अमेरिकेत जाऊन भारत कसा वाईट, यावर व्याख्याने देतात. त्यांनी भारतात लोकशाही नाही, असे सांगितले आणि त्यावर अमेरिकेनेच खुलासा करून सांगितले की, भारतात लोकशाही आहे आणि ती समृद्ध सुद्धा होते आहे. खरे तर काँग्रेसला लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही, आजचाच दिवस आहे, ज्यादिवशी इंदिरा गांधी यांनी लोकशाहीची हत्या केली होती, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.