मुंबई पोलिसांना धमकी! सीमा हैदरला पाकिस्तानात परत पाठवा; नाहीतर दहशतवादी हल्ल्यासाठी तयार राहा

अवैधरित्या भारतात आली होती सीमा… मग पुढे…

मुंबई : पाकिस्तान सोडून नेपाळमार्गे आपल्या चार मुलांसह पळून आलेल्या सीमा हैदर प्रकरणी मुंबई पोलिसांना दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देण्याऱ्या व्यक्तीने सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवा, नाहीतर दहशतवादी हल्ल्यासाठी तयार राहा, अशा स्वरुपाची धमकी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) कंट्रोल रुमला संपर्क करून दिली आहे. या धमकीचा फोन १३ जुलै रोजी आल्याची माहिती मिळत आहे.

पाकिस्तानी महिला सीमा हैदर भारतात अवैधरित्या दाखल झाल्याने आधीच वातावरण तापलं असताना आता या धमकीच्या फोनमुळे खळबळ माजली आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने धमकी दिली आहे की, पाकिस्तानी नागरिक सीमा हैदरला पाकिस्तानात परत पाठवा अन्यथा २६/११ सारख्या दहशतवादी हल्ल्याला तयार राहा. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला असे अनेक फोन येतात, त्यामुळे हा फोन कॉल खरा आहे की बोगस याचा शोध आता मुंबई पोलीस आणि क्राईम ब्रांच घेत आहेत.

याबद्दल माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, या धमकीत उत्तर प्रदेश सरकारला दोष देण्यात आला असून या प्रकरणाचा आता कसून तपास सुरु आहे. या धमकीच्या फोनमुळे मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पोलिसांनी सीमा हैदरबाबत संशय असून या प्रकरणात गुप्तहेरी संदर्भातील अँगलही तपासण्याचं काम सुरु आहे.

काय आहे सीमा हैदर प्रकरण ?

सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला सचिन मीना या तिच्या प्रियकरासाठी तिच्या चार मुलांसह नेपाळमार्गे भारतात पोहोचली. भारताची सीमेत येताना मात्र तिच्याकडे कोणतीही आवश्यक कागदपत्रं नव्हती. तिने अवैधरित्या भारतात घुसखोरी केली. भारतात तिने हिंदू धर्म स्वीकारत सचिन मीना या तरुणाशी लग्न केलं आहे. त्यांच्या ओळखीबद्दल ते सांगतात की, ऑनलाईन गेम पबजी खेळताना त्यांची ओळख झाली व मैत्री होऊन त्याचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. त्यानंतर सचिनला भेटण्यासाठी सीमा अवैधरित्या थेट भारतात घुसली. यामुळे सीमावर्ती भागातील अवैध घुसखोरी आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.