सामान्यांना दिलासा! सरकारकडून टॉमेटोच्या दरात कपात, आता ‘या’ दराने टॉमेटो खरेदी करा

नवी दिल्ली: टोमॅटोच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य ग्राहक मेटाकुटीला आला असताना सरकारने सामान्यांना दिलासा दिला आहे. नॅशनल कंझ्युमर कोऑपरेटिव्ह फेडरेशननं टोमॅटोच्या दरात कपात केली आहे. आता सरकारी भावानुसार टोमॅटो ९० रुपयांऐवजी ८० रुपयांना मिळतील.

टोमॅटोचे दर आवाक्यात आणण्यासाठी सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून सरकार आता दिल्ली एनसीआरसह देशाच्या विविध भागांमध्ये टोमॅटोची थेट विक्री करणार आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातून टोमॅटो खरेदी करुन एनसीसीएफ थेट ग्राहकांना टोमॅटोची विक्री करत होती. या टोमॅटोचा दर ९० रुपये प्रति किलो इतका होता. तो आता १० रुपयांनी कमी करुन ८० रुपये करण्यात आला आहे. देशातील ५०० ठिकाणी सरकार थेट टोमॅटो विकत आहे.

नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेडनं (एनसीसीएफ) सरकारच्या सूचनेवरुन महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून टोमॅटोंची खरेदी केली आहे. या टोमॅटोंची विक्री दिल्लीत अनेक ठिकाणी सुरू आहे. गेल्या महिन्याभरापासून देशात टोमॅटोचे दर भडकले आहेत. या कालावधीत टोमॅटोचे दर तिपटीनं वाढले आहेत. टोमॅटोचे दर आभाळाला भिडल्यानं अनेकांनी स्वयंपाकात टोमॅटोचा वापर कमी केला आहे.