नवी दिल्ली कर्तव्य पथावरील प्रजासत्ताक दिन:वंदे भारतम हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम ठरला आकर्षणाचा प्रमुख केंद्रबिंदू

सांस्कृतिक मंत्रालयाच्या रंगीबेरंगी चित्ररथातून ‘नारी शक्ती’चा अविष्कार

नवी दिल्ली,२६ जानेवारी / प्रतिनिधी:- नवी दिल्लीमध्ये कर्तव्यपथ इथल्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात आज सांस्कृतिक मंत्रालयाचा वंदे भारतम हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतून निवड झालेल्या 479 कलाकारांनी ‘नारी शक्ती’ या संकल्पनेवर संपूर्ण देशासमोर सादरीकरण केले. भव्य संचलनामध्ये या कलाकारांनी आपल्या ऊर्जामय आणि दमदार सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले, आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या खऱ्या भावनेने भारताचा वैविध्यपूर्ण सांस्कृतिक आणि कलात्मक वारसा प्रदर्शित केला.

वंदे भारतम कार्यक्रमाचे संगीत राजा भवथारिनी आणि आलोकनंदा दास गुप्ता यांनी दिले होते, आणि ही रचना हिंदुस्तानी, कर्नाटकी आणि समकालीन जॅझ संगीतावर आधारित होती. 

सांस्कृतिक मंत्रालयाचा ‘शक्ती रूपेण संस्थिता’ या शीर्षकाचा रंगीबेरंगी चित्ररथ देखील आज कर्तव्य पथावरील प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात प्रदर्शित करण्यात आला. हा चित्ररथ देवीच्या ‘शक्ती’ रूपावर आधारित होता. या चित्ररथावर देवतांचा जयजयकार करणारी अनेक लोकनृत्ये सादर करण्यात आली.

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने एकत्र येऊन वंदे भारतम नृत्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. हा एक अखिल भारतीय नृत्य महोत्सव असून, लोकांमधील ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ च्या भावनेला चालना देऊन, त्याचं तेज नृत्यामधून जगासमोर प्रतिबिंबित करणे, हे याचे उद्दिष्ट आहे. 15 ऑक्टोबर 2022 रोजी सुरू झालेल्या या स्पर्धेच्या दुसऱ्या भागात देशाच्या कानाकोपऱ्यातील कलाकारांनी भाग घेतला होता. या स्पर्धेचे राज्य, विभागीय आणि राष्ट्रीय असे तीन टप्पे होते आणि यामध्ये सहभागी होण्यासाठीची विहित वयोमर्यादा 17 ते 30 वर्षे होती. या स्पर्धेची अंतिम फेरी 19 आणि 20 डिसेंबर 2022 रोजी नवी दिल्ली इथल्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर आयोजित करण्यात आली होती.