परप्रांतीय कामगारांची वापसी सुरू; पोलिसांकडून योग्य खबरदारी – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई दि. 18 : लॉकडाउनच्या शिथिलीकरणानंतर आता राज्यात विविध उद्योगधंदे हळू हळू सुरू झाले आहेत. यासाठी परप्रांतीय कामगार राज्यात परत येत आहेत. त्या सर्व कामगारांची योग्य नोंद थर्मल तपासणी करण्यात येत आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील परप्रांतीय कामगार वर्ग हा आपआपल्या राज्यात परत गेला होता. तो आता महाराष्ट्रात मोठ्या संख्येने परत येत आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, रायगडसह राज्याच्या इतर भागातही दररोज जवळपास 15.50 हजार कामगार येत आहेत. यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या सर्व कामगारांची यादी संबंधित राज्यांकडून आपल्याकडे पाठवण्यात येते. त्या यादीनुसार आलेल्या सर्व कामगारांची नोंद, तसेच त्यांची थर्मल तपासणी करण्यात येते व त्यानंतर त्यांच्या हातावर होम क्वॉरंटाईन शिक्का मारून त्यांना राहण्याच्या ठिकाणी होम क्वॉरंटाईनसाठी पाठवण्यात येते. मुंबईमध्ये बेस्टमार्फत पाठवण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

राज्यातील गोंदिया, नंदुरबार, कोल्हापूर, नागपूर, पुणे या ठिकाणी सध्या साधारणतः 4 ते 5 हजार तर मुंबई ठाणे नवी मुंबई भागात 11 ते 11.50 हजार परप्रांतीय कामगार दररोज येत आहेत. सध्या मर्यादित रेल्वे सुरू असल्याने ही संख्या कमी आहे, पण आपल्याकडील उद्योगधंदे व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यानंतर या संख्येत निश्चितच वाढ होईल. त्यावेळी देखील योग्य ती खबरदारी घेण्यात येईल असे श्री. देशमुख यांनी स्पष्ट केले.

समाजकंटकांना गृहमंत्र्यांचा इशारा

महाराष्ट्र राज्य हे कायदा व सुव्यवस्थेचे राज्य आहे. कोणत्याही परिस्थितीत आपल्या राज्यात कोणत्याच समाजावर होणारे अन्याय, अत्याचार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत.अशा दोषींविरुद्ध तात्काळ व अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल. असा सज्जड इशारा गृह मंत्री अनिल देशमुख यांनी समाजकंटकांना दिला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा सांगणारे आपले राज्य असून या राज्यात गोरगरीब, दीनदुबळ्यांवर अन्याय अत्याचार होता कामा नये.

राज्यात काही ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. त्यातील दोषींविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस विभागाला दिले असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले. अशा प्रकारच्या घटना जर राज्यात घडल्या तर पोलिसांनी तात्काळ पुढील कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश पोलीस विभागाला दिले असल्याचे श्री. देशमुख यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *