भाजपच सुस्साट! देशातील चार राज्यांमध्ये स्पष्ट बहुमत

Image
पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला अभूतपूर्व यश

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भाजपला चार राज्यांमध्ये स्पष्ट बहुमत मिळाले आहे. उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपने निर्णायक आघाडी घेत राजकीय करिष्मा कायम ठेवला आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसचा धुव्वा उडवत आम आदमी पार्टीने (आप) अभूतपूर्व यश संपादित करत विजयाचा शंखनाद केला.उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यात भाजपला परत येण्यापासून कोणताही पक्ष किंवा आघाडी रोखू शकलेली नाही. पंजाबमध्ये मात्र आम आदमी पक्षाने काँग्रेसचा सुपडा साफ केला.

उत्तर प्रदेश निकाल : देशातील पाच राज्यांपैकी सर्वात मोठी लढाई 400 हून अधिक विधानसभा मतदारसंघ असलेल्या उत्तर प्रदेशची होती. उत्तर प्रदेशच्या जनतेने भाजपला स्पष्ट बहुमत दिले आहे. भाजपने 267 जागा पटकावल्या असून समाजवादी पक्षाला 131 जागांवर समाधान मानावं लागलं. तर बहुजन समाज पक्ष एक आणि काँग्रेस दोन जागी कसाबसा जिंकल्याने दोन्ही पक्षांचा सुपडा साफ झाला आहे.

गोवा निकाल : गोव्यात भाजप सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. गोव्यात बहुमताचा आकडा 21 इतका आहे, सध्या भाजप 20 जागांवर असून बहुमतासाठी 2 जागांची गरज आहे. तर 3 अपक्षांच्या समर्थनासह गोव्यात भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याशिवाय अतिरिक्त संख्याबळासाठी महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाशी भाजपची बोलणीही सुरु केली आहे. त्यामुळे आता भाजप राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे.

पंजाब निकाल : पंजाब विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाची राजकीय त्सुनामी आली आहे. आप पक्षाने पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसचा पूर्ण पराभव केला आहे. पंजाबमधील जनतेने आप पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पंजाबमध्ये अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे. पंजाबमध्ये 92 जागांवर आपचे उमेदवार विजयी झाले आहेत.

उत्तराखंड निकाल : उत्तराखंडमध्ये भाजपने सर्व पक्षांना मागे सोडत 49 जागांवर सर्वात मोठी आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसला 14 जागांवर समाधान मानावे लागले आहे. उत्तराखंडमध्ये आम आदमी पक्षाला खातेही उघडता आले नसून इतर पक्ष 4 जागांवर आहेत. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या निवडणुकीच्या निकालाबाबत बरेच चढ-उतार पाहायला मिळाले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून कडवी स्पर्धा झाली. दुसरीकडे, काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला.

मणिपूर निकाल : मणिपूरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या 60 जागांसाठीचे बहुते निकाल हाती आले असून यामध्ये भाजपने एकहाती सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकले आहे. भाजप उमेदवार आतापर्यंत 60 पैकी 28 जागी विजयी झाले आहेत. तर काँग्रेस 09, एनपीपी 09 आणि इतर 08 जागांवर आहेत.

पंजाब जिंकताच केजरीवालांनी केले आम आदमी पक्षात प्रवेश करण्याचे आवाहन

चंदिगड : अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या जनतेचे आभार मानले आहेत. तसेच आता आम आदमी पक्षाचे लक्ष्य राष्ट्रीय राजकारण असेल असे स्पष्ट केले. दिल्लीतून सुरू झालेला ‘इन्कलाब’ हा आता पंजाबमध्ये पोहोचला आहे. आता हा ‘इन्कलाब’ देशभरात पोहोचेल, असे सांगत अरविंद केजरीवाल यांनी सर्वांना आम आदमी पक्षात प्रवेश करण्याचे आवाहन केले आहे.

अरविंद केजरीवाल म्हणाले की, पंजाबच्या लोकांनी कमाल केली. लव्ह यू पंजाब. आज पंजाबमध्ये जे निकाल लागले आहेत. तो एक मोठा इन्कलाब आहे. आज पंजाबमध्ये मोठमोठ्या खुर्च्या हलल्या आहेत. बादल, कॅप्टन, चन्नी, सिद्धू असे दिग्गज पराभूत झाले आहेत. ही मोठी क्रांती आहे. आज जे कुणी माझं भाषण ऐकत आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की, सध्याची परिस्थिती पाहून तुम्हालाही वाईट वाटत असेल. नेते, पक्ष देशाला ज्याप्रकारे लुटत आहेत ते पाहून तुम्हालाही राग येत असेल. तुम्हालाही काहीतरी करायचं आहे. आता ती वेळ आली आहे. आधी दिल्लीत इन्कलाब झाला, आता पंजाबमध्ये इन्कलाब झाला.

आता हा इन्कलाब देशभरात पसरेल. सर्व महिला, तरुण, शेतकरी, मजूर, उद्योगपती यांनी आता आम आदमी पक्षात प्रवेश करावा. मी काय करू शकतो, असं तुम्हाला वाटत असेल. मात्र चन्नींना कुणी हरवलंय हे तुम्हाला माहिती आहे का, लाभसिंग उगोके या मोबाईलच्या दुकानात काम करणाऱ्या व्यक्तीने चन्नींना पराभूत केलं आहे. आपची सामान्य महिला जीवनज्योत कौर यांनी सिद्धूंना पराभूत केलंय. आम आदमीमध्ये खूप शक्ती आहे, हे लक्षात ठेवा. सर्वांनी आपली ताकद ओळखा, आता देशभरात इन्कलाब आणायचा आहे, असे आवाहन केजरीवाल यांनी म्हटले आहे.

केजरीवाल पुढे म्हणाले की, स्वातंत्र्य मिळाल्यावर व्यवस्था बदलली नाहीत तर काही होणार नाही, असं भगतसिंग यांनी म्हटलं होतं. गेल्या ७५ वर्षांत हे पक्ष आणि राजकारण्यांनी सिस्टिम बदलली नाही. लोकांना जाणून बुजून गरीब ठेवलं. आपने सिस्टिम बदलली. लोकांची काम व्हायला लागतील. बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंह यांचं स्वप्न पूर्ण व्हायला लागलं आहे, असे केजरीवाल म्हणाले.

हे लोक म्हणजे मोठ्या शक्ती आहेत. हे लोक देशाला रोखण्याचं काम करताहेत. पंजाबमध्ये हे सर्व आपविरोधात एकत्र झाले होते. आप जिंकता कामा नये, यासाठी प्रयत्न सुरू होते. शेवटी केजरीवाल दहशतवादी आहे असे म्हणाले. आज या निकालांमधून जनतेने केजरीवाल दहशतवादी नाही, तर देशाचा सुपुत्र आहे, देशभक्त आहे हे सिद्ध झाले. केजरीवाल दहशतवादी नाही तर तुम्ही दहशतवादी आहात हे निकालांनी दाखवून दिले.

आज आपण सर्वांनी संकल्प करूया की, एक नवा भारत बनवू, ज्यात द्वेष नसेल, सर्वजण एकमेकांवर प्रेम करेल. कुणी उपाशी राहणार नाहीत. महिला सुरक्षित राहतील. गरीब श्रीमंतांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळेल. आपण असा भारत बनवू जिथे खूप मेडिकल, इंजिनियरिंगचे कॉलेज सुरू होतील. भारतातील विद्यार्थी बाहेर जाणार नाहीत, तर बाहेरचे विद्यार्थी भारतात शिकण्यासाठी येतील, असा विश्वासही केजरीवाल यांनी व्यक्त केला.