अखेर जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश सोहळा

वैजापूर, १४ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांच्या विरोधामुळे लांबणीवर पडलेला जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश सोहळा मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांच्या उपस्थितीत मुंबईत झाला.

 

गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. ठोंबरे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशासाठी आ.सतीश चव्हाण यांनीही आग्रही भूमिका घेतली होती. मात्र ठोंबरे यांच्या पक्ष प्रवेशाला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर व त्यांच्या समर्थकांनी विरोध दर्शविल्यामुळे जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश लांबणीवर पडला होता. विरोध असला तरी आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश निश्चित असल्याचे जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे ठामपणे सांगत होते. अखेर प्रवेश सोहळ्यासाठी आज मुहूर्त सापडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या रुपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक माजी आमदार अमरसिंह पंडीत,  राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, जेष्टनेते भाऊसाहेब पाटील ठोंबरे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद सदस्य पंकज पाटील ठोंबरे व वैजापूर मर्चंट बँकेचे उपाध्यक्ष उल्हास पाटील ठोंबरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. ठोंबरे यांच्या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तालुक्यात बळ मिळणार आहे.

काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी मी नेहमी खंबीरपणे उभा असतो : अजित दादा पवार

याप्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले की, पंकज ठोंबरे व त्यांच्या सर्व समर्थकांचा पक्ष प्रवेश बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होता. अनेकदा बऱ्याच वेळा या विषयावर चर्चा देखील झाली. अडचणीच्या काळात त्या सर्वांनी त्यांचा विचार ढळू न देता संयम ठेवला साहेबांच्या विचारावर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवत आजच्या दिवसाच्या वाट बघितली त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. औरंगाबाद जिल्हा नेहमीच साहेबांवर विश्वास ठेवणारा जिल्हा आहे. पण आज परिस्थिती थोडी वेगळी आहे. त्यामुळे तुम्हाला अजुन खुप काम करायचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच काम करणाऱ्या माणसाला प्राधान्य देतो. ज्याच्यात कर्तृत्व असेल नेतृत्व असेल अशा माणसांना इथं प्राधान्य असतं. त्यामुळे तुम्ही काम करा मी तुमच्या सोबत आहे, जिथं अडचण येईल तिथं मी तुमच्यासाठी उपलब्ध असेल. असे सांगून येत्या महिनाभरात वैजापूरला मेळावा घेऊन राहिलेल्या कार्यकर्त्यांचा प्रवेश घेतला जाईल. असे ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, आज वैजापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकत वाढविण्याचा पाऊल उचललं जातंय. पंकज ठोंबरे सारखं एक सक्षम, लढवय्या जो वैजापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच काम समर्थपणे करू शकेल असा एक युवा कार्यकर्ता आज काँग्रेस पक्षातून आपल्या पक्षात येत आहे याचा आनंद वाटतो. असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

तत्पूर्वी पंकज ठोंबरे यांनी सांगितले की, वैजापूर तालुक्यात काम करत असताना शेवटच्या माणसा पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आदरणीय पवार साहेबांचे विचार पोहचविण्याचे काम करेल.

यावेळी ठोंबरे यांच्यासमवेत पंचायत समिती सदस्य विनायकराव गाडे, युवक अध्यक्ष सत्यजित सोमवंशी, एराज शेख, सरपंच भगतसिंह राजपुत, अमृत शिंदे, गणेश पवार, दिगंबर तुरकणे, दत्तात्रय खटाणे, गोकुळ कुंजीर, पुंडलिक गायकवाड, संदीप मोटे, रवींद्र निकम, रवी डोंगरे, सुनील कुंदे, वैभव जाधव, यांच्यासह सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य यासह कार्यकर्ते आदींनी प्रवेश घेतला. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दत्तात्रय पाटील, सूरज पवार, बाळासाहेब भोसले, बाळासाहेब शेळके, एल एम पवार, विजय पवार, गणेश चव्हाण, आनंद निकम साईनाथ आहेर, संजय आहेर, रावसाहेब सावंत, ऋतुराज सोमवंशी यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

औरंगाबाद जिल्हा काँग्रेसचे माजी  अध्यक्ष भाऊसाहेब पाटील ठोंबरे यांनीही काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश केला. मात्र, त्यांना प्रवेशाबद्दल विचारले असता, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला नसल्याचे त्यांनी “आज दिनांक” शी बोलतांना सांगितले.