वैजापूर बाजार समितीच्या १८ जागांसाठी आज मतदान ;४१​ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार

आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

प्रस्थापितांना नाकारणार की स्वीकारणार ?

वैजापूर ,२७ एप्रिल  / प्रतिनिधी :- वैजापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या अठरा जागांसाठी वैजापूर शहरातील एका मतदान केंद्रासह एकूण आठ मतदान केंद्रावर  शुक्रवारी (ता.28) मतदान होत आहे. या निवडणुकीत ४१​ उमेदवारांचे राजकिय भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागणार आहे. मतदार प्रस्थापितांना नाकारणार की नवोदितांना स्वीकारणार यावर निकाल अवलंबून असणार आहे‌. 

विद्यमान आमदार रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेश परदेशी व माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांचे चिरंजीव आप्पासाहेब पाटील यांच्या अधिपत्याखालील बळीराजा शेतकरी विकास पॅनलने प्रस्थापितांसोबतच नवोदितांनाही संधी दिली आहे तर शिवसेना ठाकरे गट, कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस, भाजपा, वंचित आघाडी यांच्या शेतकरी विकास पॅनलमध्ये प्रस्थापित उमेदवार असल्याने ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे. कोणत्या पॅनलचे किती उमेदवार निवडून येतील याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. दोन्ही पॅनलने आमचेच उमेदवार निवडून येतील असा दावा केला असला तरी प्रत्यक्षात काय होईल याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. सोसायटी मतदार संघातील अकरा, ग्रामपंचायत मतदार संघातील चार, व्यापारी मतदार संघातील दोन व हमाल मापाडी मतदार संघातील एक अशा अठरा जागांसाठी मतदान होणार आहे. दोन्ही पॅनलने तुल्यबळ उमेदवार दिले आहेत. सोसायटी मतदार संघातील मतदारांवर प्रभाव असणाऱ्या पॅनलचे मतदान निर्णायक ठरणार असले तरी त्या खालोखाल ग्रामपंचायतीमधील चारही जागा ताब्यात घेण्याकडे कल असल्याने या दोन्ही मतदारसंघात खरी चुरस बघायला मिळेल.

या दोन्ही मतदारसंघावरच दोन्ही पॅनलने लक्ष केंद्रीत केले असून पंधरा जागांपैकी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचे नियोजन केले आहे. पॅनलप्रमाणे मतदान झाल्यास कोणत्याही एका पॅनलचे जास्त उमेदवार निवडून येऊन सत्ता मिळण्याची शक्यता आहे. परंतु तसे न झाल्यास क्रॉस वोटिंग मुळे उमेदवारांसह संपुर्ण पॅनलचे भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.‌ वैजापूर शहरातील एका मतदार केंद्रासह शिऊर, खंडाळा, लोणी, गारज, महालगाव व लाडगाव व दहेगाव येथील मतदान केंद्रावर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर चार मतदान अधिकारी व दोन पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. चार मतदार संघासाठी चार स्वतंत्र मतपत्रिका (बॅलेट पेपर) असणार असून मतदारसंघातील जागांप्रमाणे संबंधित मतदाराला शिक्के मारावे लागणार आहेत. सोसायटी मतदार संघात एक हजार 410, ग्रामपंचायत मतदारसंघात एक हजार 136, हमाल मापाडी मतदार संघात 322 व व्यापारी मतदार संघात 162 असे तीन हजार 30 मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत.