राज्यात लवकरच सत्तांतर होणार – अजित पवार यांचे वैजापुरात भाकीत

वैजापूर ,११ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- वाढती महागाई, बेरोजगारी, औद्योगिक प्रकल्पांचे स्थलांतर, कायदा व सुव्यवस्था याबाबत हे सरकार अजिबात गंभीर नाही. त्यामुळे येत्या काळात राज्यात सत्तांतर झाल्याशिवाय राहणार नाही असे भाकीत राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी वर्तवले. न्यायालयाने आमदारांची अपात्रता व पक्ष चिन्हाचा लवकर निकाल लावावा अशी अपेक्षा व्यक्त केली व आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीला साथ देण्याची साद घालत त्यांनी निवडणुक प्रचाराचे बिगुल फुंकले.

वैजापुर येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसतर्फे आयोजित शेतकरी मेळाव्यात अजित पवार बोलत होते. यावेळी राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री जयसिंग गायकवाड, आमदार सतीश चव्हाण, शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे, माजी आमदार अण्णासाहेब माने, किशोर पाटील, जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, कार्याध्यक्ष मनोज घोडके, पक्ष निरीक्षक अमरसिंह पंडित आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, जेष्ठ नेते भाऊसाहेब ठोंबरे, तालुकाध्यक्ष ॲड. प्रताप निंबाळकर, आबासाहेब भोसले, ज्ञानेश्वर घोडके, विश्वजित चव्हाण, अमृत शिंदे यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी पंकज ठोंबरे व ॲड. निंबाळकर यांनी प्रास्ताविकात मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न दादांसमोर मांडले.

पवार म्हणाले, आज राज्यात काय परिस्थिती आहे याची सर्वांना जाण आहे. सोळा आमदारांची अपात्रता व पक्ष चिन्ह हे दोन्ही न्यायप्रविष्ट प्रश्न आहेत. न्यायदेवतेबाबत आम्हाला आदर आहे. पण या प्रश्नावर ‘ तारीख पे तारीख ‘ मिळत असल्याने करायचे काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याप्रकरणी न्यायालयाने लवकर निकाल द्यावा असे ते म्हणाले. वेदांता हा दोन लाख कोटींची गुंतवणुक असलेला व दोन लाख जणांना रोजगार देणारा प्रकल्प गुजरातेत गेला. तसेच बल्क ड्रग्स नावाच्या प्रकलपाचेही स्थलांतर झाले.‌ त्यामुळे राज्याला तब्बल 26 हजार 200 कोटी रुपयांचा जीएसटी कर मिळणार नाही. या प्रकल्पांमुळे दरडोई उत्पन्नात अठरा टक्के वाढ झाली असती असे पवार म्हणाले.

या सरकारने सात महिन्यात केवळ जाहिरातींवर तब्बल 45 कोटींचा खर्च केला मात्र सरकारच्या वैद्यकिय कक्षातुन गरीबांच्या वैद्यकिय मदतीसाठी २८ कोटीच खर्च केले. सरकारने मुठभर उद्योगपतींचे अकरा लाख दहा हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. आता हे आर्थिक वर्ष संपण्यास केवळ दीड महिना राहिला आहे. मात्र सरकारकडे निधी खर्च करण्याचे कुठलेही नियोजन नाही अशी टीका त्यांनी केली.

या कार्यक्रमात माजी उद्योग संचालक जे.के. जाधव, माजी पंचायत समिती सदस्य वाल्मिक बोढरे, सुनील गवळी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाचे सुत्र संचलन अमृत शिंदे यांनी केले. कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य दिपक राजपूत, एल.एम. पवार, बाळु शेळके, संतोष माने, आनंद निकम, अँड. ज्योती शिंदे कापसे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर महिला व शेतकरी उपस्थित होते.

पंकजला साथ द्या …

वैजापूर मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसचे हात बळकट करण्यासाठी युवा नेतृत्व व माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे यांना साथ द्या असे आवाहन शेतकरी मेळाव्यात पवार यांनी केले. ठोंबरे यांच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर पवारांनी हे वक्तव्य केले. ठोंबरे यांचे पक्ष कार्यालय चांगले आहे. मात्र ते व्यवस्थित सुरु ठेवा जेणेकरुन कार्यकर्त्यास न्याय मिळेल असा सल्ला पवार यांनी दिला.