ग्रामसेविका मनमानी कारभार ; पिंपळगाव (खंडाळा) ग्रामपंचायतीला पदाधिकाऱ्यांनी ठोकले कुलूप

वैजापूर ,२७ एप्रिल  / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील पिंपळगाव खंडाळा येथील ग्रामसेविका एम.एम. भिवसने या मनमानीपणे कारभार करीत असल्याने गावातील विकासकामे खोळंबली आहेत असा आरोप करत सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयास कुलुप लावले. ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देत कार्यालयाची चावी त्यांच्याकडे सुपुर्द केली आहे. 

या घटनेबाबतची अधिक माहिती अशी की, वैजापूर तालुक्यातील पिंपळगाव खंडाळा या ग्रामपंचायतीचा कारभार ग्रामसेविका एम.एम.भिवसने यांच्याकडे आहे. पण त्या सातत्याने मुख्यालयी गैरहजर राहतात. मासिक बैठकीसाठी नोटिस काढतांना सरपंच व उपसरपंच यांना विश्वासात घेत नाहीत, पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करीत नाहीत, पंधराव्या वित्त आयोगातून बसवलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाची देयके न देणे, उपसरपंच व सदस्य यांना नोकरांसारखी वागणूक देणे, शौचालय नसतांना निवडणुक लढवण्यासाठी खोटे प्रमाणपत्र देणे, ग्रामसभा न घेणे आदी आरोप निवेदनात करण्यात आले आहेत.

या निवेदनावर सरपंच रुक्मिणबाई चव्हाण, उपसरपंच इंदुबाई काटे, ग्रामपंचायत सदस्य बाबुराव बागुल, रेणुका काटे, राजेंद्र काटे, विकास काटे, सोमनाथ दुतोंडे, संजय काटे, रावसाहेब चव्हाण, रघुनाथ बागुल, वाल्मिक बागुल, गोपीनाथ काटे, तुषार काटे, नवनाथ सुराशे, रमेश सुराशे आदींच्या सह्या आहेत.