छत्तीसगडच्या दंतेवाडात नक्षलवाद्यांचा हल्ला; १० जवान आणि १ चालक शहीद

दंतेवाडा :-आज छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यातील दंतेवाडा भागात नक्षलवाद्यांनी आयईडी ब्लास्ट घडवून आणला. या हल्ल्यात ११ जवान शहीद झाले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये या भागात नक्षलवादी कारवाया कमी झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, आज झालेल्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सध्या याठिकाणी नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक सुरु असल्याचे सांगितले जात आहे.

 दंतेवाडा जिल्ह्यातील अरनपूर पोलीस स्थानकाच्या हद्दीत नक्षलवादी सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह गार्डसह जवानांचे एक पथक नक्षल विरोधी मोहिमेसाठी रवाना झाले. या मोहिमेवरून परतत असताना अरनपूर मार्गावर आयईडी ब्लास्ट घडवण्यात आला. या भीषण स्फोटामध्ये १० डीआरजीचे जवान आणि एका वाहन चालक शहीद झालेत. दरम्यान, या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे.

पाच दिवसांपूर्वीच सुरक्षा दलांनी सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला होता. नक्षलवाद्यांच्या दैनंदिन वापरातील वस्तूंसह मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला होता. या कॅम्पमध्ये जवळपास 25 ते 30 नक्षलवादी असल्याचे सांगण्यात येत आहे. जवान आल्याची माहिती मिळताच सर्व नक्षलवादी पळून गेले.

दोन रेल्वेगाड्या रद्द

बस्तरमध्ये किरंदुल-विशाखापट्टणम पॅसेंजर आणि नाइट एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या दोन्ही पॅसेंजर ट्रेन आज दंतेवाडाहून किरंदुलपर्यंत जाणार नाहीत. तथापि, किरंदुल ते विशाखापट्टणमला लोहखनिज घेऊन जाणाऱ्या मालगाड्यांची वाहतूक सुरू राहील. ECO (ईस्ट कोस्ट) रेल्वे विभागाने पॅसेंजर गाड्या बंद करण्याबाबत आदेश जारी केला आहे.

पंतप्रधानांनी केला निषेध

छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात छत्तीसगड पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे. या हल्ल्यात प्राण गमावलेल्या शूर जवानांनाही पंतप्रधानांनी श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधानांनी ट्विट केले;

“दंतेवाडा येथे छत्तीसगड पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध. या हल्ल्यात प्राण गमावलेल्या शूर जवानांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे बलिदान सदैव स्मरणात राहील. शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या सहवेदना.”

आठवडाभरापूर्वी आमदारांच्या ताफ्यावर झाला होता हल्ला

विजापूरमधील काँग्रेस आमदार विक्रम मांडवी यांच्या ताफ्यावर माओवाद्यांनी आठवड्याभरापूर्वी हल्ला केला होता. जिल्हा पंचायत सदस्या पार्वती कश्यप ज्या वाहनात बसल्या होत्या त्या वाहनावर गोळीबार झाला. सर्वजण सुरक्षित आहेत. आमदार विक्रम मांडवी, जिल्हा पंचायत सदस्य यांच्यासह काँग्रेस नेते गांगलूरला गेले होते. येथील साप्ताहिक बाजारात मंगळवारी नुक्कड सभेचे आयोजन करण्यात आले होते. परतत असताना पडेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी धावत्या वाहनांवर गोळीबार केला.