महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये भूकंप होणार! तृणमूल काँग्रेसचे ३८ आमदार भाजपाच्या संपर्कात

कोलकाता : शिवसेनेत झालेल्या बंडखोरीचा फायदा घेत भाजपाने महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणले. आता भाजपाच्या निशाण्यावर बंगाल असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपाचे पश्चिम बंगालमधील नेते मिथुन चक्रवर्ती यांनी तृणमूल काँग्रेसचे ३८ आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याच्या केलेल्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मिथुन चक्रवर्ती गतवर्षीच भाजपामध्ये दाखल झाले होते. आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमधील ३८ आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. त्यामधील २१ आमदार माझ्या संपर्कात आहेत, असा दावा मिथुन चक्रवर्ती यांनी केला आहे.दरम्यान, भाजपाच्या मुस्लिमविरोधी प्रतिमेबाबत मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, भाजपा दंगे करतो असा आरोप सातत्याने केला जातो. मात्र मी स्पष्टपणे सांगतो की, असे आरोप करणे हा केवळ एका कारस्थानाचा भाग आहे.