शिऊर पोलिसांची पेट्रोलिंग व्हॅन उलटून एक पोलिस कर्मचारी जागीच ठार तर एक गंभीर जखमी

अचानक हरीण समोर आल्याने घडला अपघात

वैजापूर ,२२ एप्रिल  / प्रतिनिधी :- रात्री पेट्रोलिंगवर असताना अचानक हरीण समोर आल्याने पोलिस व्हॅन उलटून झालेल्या अपघातात एका पोलिस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला.शिऊर गावाजवळ शुक्रवारी रात्री तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिस कर्मचारी विठ्ठल एकनाथ बदने

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिऊर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी विठ्ठल एकनाथ बदने (48 वर्ष) व सिद्धेश्वर इधाते (24 वर्ष) हे दोघे काल रात्री त्यांच्या हद्दीत पेट्रोलिंगवर होते.लोणी गावाकडून शिऊरकडे येत असताना रस्त्यात असलेल्या मंगल कार्यालयाजवळ अचानक हरीण समोर आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी पलटी झाली. या अपघातात बदने व इधाते हे गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना बदने यांचा मृत्यू झाला तर इधाते यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सिग्मा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. या प्रकरणी शिऊर पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अपघातात मृत्यू पावलेले पोलिस कर्मचारी बदने हे शांत स्वभावाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.