वीज यंत्रणेजवळ कचरा टाकू वा जाळू नका:महावितरणचे नागरिकांना आवाहन 

छत्रपती संभाजीनगर ,२२  एप्रिल / प्रतिनिधी :-सध्या कडक उन्हाचे दिवस आहेत. अनेक ठिकाणी वीज वाहिन्या, रोहित्र, फीडर पिलर किंवा वितरण पेट्यांजवळ कचरा जाळण्याच्या प्रकारांमुळे वीजयंत्रणेला धोका निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिकांसोबतच वीजवितरण कंपनीलाही नाहक मनःस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे या तप्त वातावरणात वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू नये आणि जाळूही नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.      

शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या, फिडर पिलर, वितरण रोहित्र, वितरण पेटी किंवा विद्युत खांब अशा वीज यंत्रणेजवळील उघड्यावर असलेल्या जागेत कचरा टाकण्यात येतो. वीज यंत्रणेजवळ साठवलेला हा कचरा पेटवल्याने किंवा इतर कारणामुळे कचरा जळाल्याने विजेच्या भूमिगत केबल व इतर वीजयंत्रणा आगीमुळे नादुरुस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पर्यायाने संबंधित परिसरातील वीजपुरवठाही खंडित झालेला आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्याने कचऱ्यास आगी लागण्याचे प्रकार वाढत आहेत.      उन्हामुळे तापलेल्या वीज यंत्रणेला असल्याने अशा आगीमुळे फटका बसतो. वीजवाहिनीखाली असलेल्या कचऱ्याचे ढीग पेटल्यामुळे किंवा त्याला आग लागल्यामुळे वीजतारा वितळून वीज खंडित होण्याचा धोका अधिक आहे. शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी उघड्यावर असलेल्या वीजयंत्रणेला धोका निर्माण होईल अशा ठिकाणी कचरा टाकू नये किंवा साठवलेला कचरा जाळू नये. अशा घटनांतून वीज यंत्रणेला आग लागल्याचे आढळल्यास 1912 किंवा 1800-212-3435 आणि 1800-233-3435 या टोल फ्री क्रमांकावर किंवा नजिकच्या महावितरण कार्यालयाला त्याची माहिती देण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.