हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या इतिहासाचे दस्तऐवजीकरण व्हावे- डॉ.रश्मी बोरीकर

हैदराबाद मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय परिषद

छत्रपती संभाजीनगर,१३ सप्टेंबर /प्रतिनिधी :- हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा इतिहास 100 वर्षापेक्षा अधिक कालावधीचा आहे. मुक्तिसंग्राम कधीही धार्मिक कारणांसाठी नव्हता. वस्तुत: हा इथल्या लढा घराघरातुन लढला गेला. या मुक्तिसंग्रामाच्या इतिहासाचे दस्तऐवजीकरण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ.रश्मी बोरीकर यांनी आज येथे केले.

          हैदराबाद मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष सांगता समारंभानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास व प्राचीन संस्कृती विभागाच्या वतीने दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचे उद्घाटन सत्र जिल्हा नियोजन भवनात आज सकाळी पार पडले.

            अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी डॉ.अरविंद लोखंडे, हे होते. बीजभाषक डॉ.रश्मी बोरीकर, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वैद्य, विद्या परिषद सदस्य डॉ.राजेश कर्पे, समन्वयक डॉ.गीताजंली बोरोडे, अशोक कायंदे, तहसिलदार तेजस्विनी जाधव, डॉ.गनी पटेल, तसेच इतिहास संशोधक अभ्यासक उपस्थित होते.

            डॉ.बोरीकर म्हणाल्या की, मुक्तिसंग्रामाचा हा लढा स्त्रियांचा सुद्धा लढा आहे. घरातील पुरुष भूमिगत झाल्यावर स्त्रियांनीच हा लढा सुरु ठेवला. आपल्या बीजभाषणात डॉ.बोरीकर यांनी मुक्तिसंग्रामातील सहभागी स्त्री स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानापर विशेष प्रकाश टाकला. प्रास्ताविक डॉ.राजेश कर्पे यांनी केले. तर डॉ.लोखंडे यांनी मुक्तिसंग्रामाच्या लढ्यासंदर्भात अभ्यासकांनी अधिक संशोधन करुन योगदान घ्यावे,असे आवाहन केले.

            या परिषदेत डॉ.व्यंकटेश लांब ,विवेक भोसले, डॉ.सुनिता सावरकर तसेच अनेक तज्ञ मार्गदर्शक सहभागी होऊन मागदर्शन करणार आहेत. सुत्रसंचालन अनिरुद्ध मोरे यांनी केले.