वैजापूर येथे भाजप – शिंदे गटाची बाजार समिती निवडणुकीसंदर्भात बैठक ; फिफ्टी-फिफ्टी जागा लढविण्याचा निर्णय

भाजपमधील एक गट निर्णयाशी असहमत 

जफर ए.खान 

वैजापूर ,​२०​ मार्च :-वैजापूर तालुक्यात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात भारतीय जनता पक्ष व शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची शनिवारी (ता.18) वैजापूर येथे बैठक झाली. या बैठकीत बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा होऊन दोन्ही पक्षांनी निम्म्या-निम्म्या जागा लढण्याचा निर्णय घेण्यात आला.मात्र, भाजपमधील एक गट या निर्णयाविरोधात असल्याचे समजते.

भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीस आ.रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान, डॉ. दिनेश परदेशी, शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, बाजार समितीचे माजी सभापती भागीनाथ मगर, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक रामहरीबापू जाधव, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील साळुंके, महेश बुणगे,पारस घाटे, भाजपचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील दांगोडे, शहराध्यक्ष दिनेश राजपूत, सूर्यकांत सोमवंशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बाजार समितीसह पंचायत समिती-जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली.  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी सर्व निवडणूका एकत्रितपणे लढण्याविषयी या बैठकीत काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सूचना मांडली. मात्र यावर एकमत झाले नाही. बाजार समितीची निवडणुकच एकत्रितपणे लढण्यासंदर्भातच यावेळी निर्णय घेण्यात आला. नगरपालिका व जिल्हा परिषद- पंचायत समिती निवडणूक एकत्रितपणे लढायची किंवा नाही याचा निर्णय झाला नसल्याची माहिती भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने दिली. तर भाजपमधील एक गट शिंदे गटाशी आघाडी करू नये या विचाराचा आहे.